Chiplun : अवैध भंगार व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

चिपळूण : चिपळूण शहरात लोकवस्तीत मोठे भंगार व्यावसाय अवैधरित्या चालू असून याबाबत चिपळूण नगरपरिषदकडे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार त्यांची कोणती ही परवानगी अथवा नोंदी नगर परिषद दफ्तरात नाही. वर्षानुवर्ष चालू असणाऱ्या या अवैध भंगार व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात नगर परिषद प्रशासनाने कमालीची दिरंगाई दाखवली असून चिपळूण शहर हे भंगाराचे हब झाले आहे. याबाबत जिल्हाधिकारी जिंदल यांनी कारवाई करावी याबाबत हिंदू राष्ट्र समन्वय समिती च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत न प चे मुख्याधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी या व्यवसायिकांना नगर परिषद प्रशासनाने काही कालावधी मागे केवळ एक नोटिस दिली होती. मात्र या व्यावसायिकांनी आजतागायत त्याला उत्तर दिलेले नाही, असे मुख्याधिकारी भोसले यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. नगरपरिषद हद्दीत अवैध व्यवसाय करून नगर परिषदेचा महसूल बुडवून हा भंगार व्यवसाय शहरात सुरू आहे. एके ठिकाणी चिपळूण नगरपरिषद आपले भंगार साहित्य या व्यावसायिकांना देत असल्याचे लक्षात येत आहे.

यामागे ही काही जणांनी याविषयी आंदोलन केले; परंतु सर्व प्रकरण शांत झाले, हे असे वारंवार होत आहे. एकीकडे नगरपरिषद प्रशासन शहर स्वच्छतेची माहिती देते आणि प्रत्यक्षात लोकवस्तीत बाजार पेठेत आणि महामार्गावर चालू असणाऱ्या या व्यवसायांवर कोणताही कारवाई करत नाही, याबद्दल आता जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालून तातडीने निर्णय घ्यावा, असे यावेळी त्यांना सांगण्यात आले. यावेळी पिंपळी खुर्द येथील रहिवासी जगदीश इंदुलकर यांची अवैध भंगार व्यवसायाबाबत स्थानिक प्रशासनाने दाखवलेली उदासीनता याबाबत ही कागदपत्रे माहितीसाठी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी अनुराग उतेकर, हेमंत चाळके, विक्रम जोशी, प्रशांत उतेकर आणि अमित जोशी, संजय जोशी आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 12/Jan/2026