राजापूर : सरस्वती पूजना निमित्ताने शाळेमध्ये दांडिया सुरू असताना चक्कर येऊन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी तालुक्यातील पाचल येथे घडली होती.
रायपाटण येथील पोलिसांच्या माहितीनुसार, सरस्वती पूजनाचा कार्यक्रम पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात सुरू होता. यावेळी प्रशालेमध्ये मुले दांडिया खेळत असताना वैष्णवी प्रकाश माने (१६, रा. आजिवली, ता. राजापूर) या मुलीला अचानक चक्कर आली. ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मुलीचे वडील प्रकाश लक्ष्मण माने यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारीत आपल्या मुलीच्या मृत्यूस शाळा प्रशासन आणि डॉक्टरांना धरून त्यांच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी केली आहे.
तक्रार अर्जात लक्ष्मण माने यांनी म्हटले आहे, की माझी मुलगी ही अत्यंत हुशार होती. १० ऑक्टोबर रोजी शाळेने दुपारच्या सत्रात गरबा नृत्याचे आयोजन केले होते. शाळेने हा कार्यक्रम भर उन्हात, सावलीची व्यवस्था न करता व मोठ्या आवाजात डीजे लाऊन आयोजित केला होता. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच शाळेचा कोणताच कर्मचारी वर्ग या कार्यक्रमाची देखरेख करीत नव्हता. कडक उन्हामुळे माझ्या मुलीला चक्कर येऊन ती त्याच ठिकाणी कोसळली. त्यानंतर सुमारे १५ मिनिटे तिला कुणीच बघायला देखील आले नाही. तिला डॉक्टरांकडे नेण्याची विनंती मुलांनी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर ३० ते ४० मिनिटानंतर डीजे बंद करुन तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. रायपाटण येथील डॉक्टरांनी देखील उशिरा येत आपल्या कामात दिरंगाई केली. या सर्व प्रकारामुळे आपली मुलगी मयत झाल्याचा आरोप प्रकाश माने यांनी केला आहे. चक्कर आल्यावर ४० ते ४५ मिनिटे बेशुद्ध असताना तिला वेळेत उपचार मिळाले असते तर आपली मुलगी वाचली असती, असे वडिलांचे म्हणणे आहे.
माझ्या मुलीच्या मृत्यूस सरस्वती विद्यामंदिर पाचल या शाळेचे प्रशासन आणि रायपाटण ग्रामीण विद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी हे जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुलीचे वडील प्रकाश माने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 28-10-2024














