दापोली : महाराष्ट्र शासनाच्या ‘आर. आर. आबा पाटील सुंदर गाव’ अभियान २०२३-२४ अंतर्गत दापोली तालुक्यातील टाळसुरे ग्रामपंचायतीने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल टाळसुरे गावाला विकासात्मक कामांसाठी १० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले, लवकरच हा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होणार आहे.
स्मार्ट ग्राम योजनेच्या निकषांनुसार टाळसुरे गावाची निवड करण्यात आली. पुरस्कारांतर्गत मिळालेल्या निधीतून गावात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणे, संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीत सौर पथदिवे बसविणे, स्वच्छतेसंबंधी अभिनव उपक्रम राबविणे तसेच शुद्ध पाणीपुरवठा अधिक सक्षम करणे अशा कामांचा समावेश आहे.
ग्रामस्थांच्या सोयीसाठी संपूर्ण गावात वाय-फाय प्रणाली बसविणे, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) लागू करणे, महिला सक्षमीकरण व बालस्नेही उपक्रम राबवणे, अतिक्रमणे रोखण्यासाठी कुंपण बसवणे, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ग्रामपंचायतीचा दर्जा उंचावणे अशा विविध कामांसाठी निधी वापरला जाणार आहे. सरपंच पूर्वा सकपाळ, उपसरपंच विकास जाधव, सर्व सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी दिनेश मर्चेंडे, जयवंत जालगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने टाळसुरे गावाने हा टप्पा गाठला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 12/Jan/2026














