खेड : “२००९ पासून विभागलेला खेड मतदारसंघ पुन्हा निर्माण होणार आहे,” असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी जाहीरपणे सांगताच संपूर्ण खेड तालुक्यात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक वर्षांपासून पुनर्रचनेची मागणी करणाऱ्या नागरिकांसाठी हा आनंदाचा क्षण ठरला आहे. ९ जानेवारी रोजी खेड येथील हॉटेल बिसू येथे झालेल्या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्यात कदम यांनी हा महत्त्वपूर्ण राजकीय संकेत दिला.
या सोहळ्यात तालुक्यातील विविध गावांमधील इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सभागृहात उपस्थित असलेल्या तालुकाप्रमुख अरुण चव्हाण, सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, विविध शाखा पदाधिकारी शिवसैनिकांनी प्रवेशकत्यांचे स्वागत केले.
नव्या सदस्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी खेड तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाचा वेग वाढवू, रोजगार, रस्ते पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण यासाठी सातत्याने प्रयत्न करणार,” असे ते म्हणाले. कदमांनी खेड नगरपालिकेतील ऐतिहासिक २१-० विजयाचा उल्लेख करत शिवसैनिकांचे मनोबल वाढवले.
या भाषणातील सर्वात ठळक आणि लक्षवेधी मुद्दा म्हणजे खेड मतदारसंघाच्या पुनर्रचनेबाबत केलेला उल्लेख. कदम म्हणाले, “२००९ पासून विभागलेला खेड मतदारसंघ पुन्हा तयार होणार आहे. आणि त्या मतदारसंघातून पुढील आमदार हा शिवसेना नेते रामदास कदम देतील तोच असेल, याची मला शंभर टक्के खात्री असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा आणि घोषणाबाजीचा गजर झाला. यावेळी कदमांनी गुहागर मतदारसंघाचा मुद्दाही अधोरेखित केला. दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदमांनी गेल्या काही वर्षात साडेतीन हजार कोटींची विकास कामे केल्याचे सांगत असताना त्यांनी स्पष्ट केले गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ते स्वतः प्रयत्नशील राहणार आहेत.
कोकणातील तरुणांसाठी त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठी घोषणा केली. “कोकणातील अनेक युवक रोजगाराच्या शोधात बाहेर गेले आहेत. मला ते कोकणातच स्थिर व्हावेत असे वाटते. कोका-कोला कंपनीचे आणखी चार प्लांट कोकणात सुरू होणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 12/Jan/2026










