दापोली : मुंबईहून बुरोंडीकडे भाड्याने कार घेऊन जात असताना चालकाने रस्त्याकडे दुर्लक्ष करून गाडी भरधाव वेगाने चालवल्याने दापोली तालुक्यातील खेर्डी येथे भीषण अपघात झाला. या अपघातात मीना रोड येथील एक ज्येष्ठ दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहल सुधाकर दळवी (वय ६२) आणि त्यांचे पती सुधाकर गंगाराम दळवी (वय ७१, रा. हिना रेसिडेन्सी, मिना रोड) हे ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६:४५ च्या सुमारास MH-02/GB-8356 या क्रमांकाच्या भाड्याच्या चारचाकी वाहनाने मुंबईहून बुरोंडीकडे जात होते. मौजे खेर्डी येथील सार्वजनिक रोडवर पोहोचले असता, चालक वेदांत श्रीकृष्ण पेडणेकर (वय २५, रा. नंदाधाम सोसायटी, मिरा रोड) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी अत्यंत वेगाने व धोकादायक पद्धतीने चालवली.
वेगामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला जाऊन जोराने धडकली. या अपघातात स्नेहल दळवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर त्यांचे पती सुधाकर दळवी यांच्या डाव्या बाजूच्या खुब्याला मार लागला. याप्रकरणी ११ जानेवारी २०२६ रोजी दापोली पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 12/Jan/2026














