Mandangad : वाल्मिकीनगर येथे अद्ययावत जेट्टीची मागणी

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील किनारी भागात असलेल्या वाल्मिकीनगर येथे मच्छीमार व्यवसायासाठी अद्ययावत व प्रशस्त जेट्टीची निर्मिती करण्याची मागणी फिशरीज वेलफेअर फौंडेशनचे अध्यक्ष सुनील खाडे, उपाध्यक्ष हेमंत सलदुरकर यांनी बंदरविकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने सबंधित महाराष्ट्रमेरीटाईम बोर्ड, मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने कार्यवाही सुरु असल्याची माहिती फिशरीज वेलफेअर फौंडेशनचे अध्यक्ष सुनील खाडे यांनी दिली. फिशरीज वेलफेअर फौंडेशनचे अध्यक्ष सुनील खाडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, अरबी समुद्र आणि सावित्री नदीच्या संगमानजिक असलेले वाल्मिकीनगर या गावातील मत्स्यव्यवसाय हा पारंपारिक व्यवसाय असून येथील जवळपास सर्वच कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन मत्स्यव्यवसाय आहे. सध्या या परिसरातून सुमारे ८० हून अधिक यांत्रिकी नौकांद्वारे मासेमारी केली जाते. याचबरोबर या बंदर परिसरातील निगडी बंदर, पेवे, पवडे, आंबवणे, शिवणवण व रायगड जिल्ह्यातील बागमांडळा, कारिवडे, आडी, विखरवाडी आदी भागांतील मच्छीमार याच बंदराचा वापर करतात. मात्र, आजतागायत या ठिकाणी स्वतंत्र व सुसज्ज मत्स्यव्यवसाय जेटी उपलब्ध नसल्याने मच्छीमारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या बंदरातून सुमारे शेकडो टन मासळीची उलाढाल होते. मात्र, आवश्यक पायाभूत सुविधा नसल्याने वेळ व पैशांचा अपव्यय होतो. वाल्मिकीनगर परिसरात लिलावगृह, मासे उतरवण्याचे केंद्र, जाळे दुरुस्ती केंद्र, विश्रांतीगृह, बर्फ कारखाना, शीतगृह, डिझेल पंप, पिण्याचे शुद्ध पाणी, प्रकाश व्यवस्था, दुरसंचार सुविधा व प्रशासकीय इमारत अशा सर्व सोयींनी युक्त अत्याधुनिक जेटी उभारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाल्मिकीनगर येथे सर्व सोयींयुक्त अत्याधुनिक जेटीची निर्मिती केल्यास येथील हजारो मच्छीमारांना मोठा दिलासा मिळणार असून मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. यासंदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या वतीने तत्काळ कार्यवाही करून जेट्टी मंजूर करावी-सुनील खाडे, फिशरीज वेलफेअर फौंडेशनचे अध्यक्ष

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 12/Jan/2026