दापोली : शहरालगत असलेल्या शासनाच्या मालकीच्या राखीव वनक्षेत्रात बेकायदेशीरपणे कचरा टाकल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. शहरातील एका नामांकित हॉटेलमधील ओला-सुका कचरा, प्लास्टिक बॉटल्या, राख आदी साहित्य प्लास्टिक पिशव्यांत भरून वनक्षेत्रात टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराबाबत दापोली वनविभागाने दोघांविरोधात ६ जानेवारी रोजी भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम २६ (डी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या वन क्षेत्रालगतच्या रस्त्यावरून ज्येष्ठ नागरिक सकाळ-सायंकाळी शतपावलीसाठी येतात, तसेच शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थीही नियमित ये-जा करतात. नर्सरी रोड परिसरात रात्रीच्या वेळी काही बेफिकीर नागरिक चारचाकी वाहनांमध्ये बसून मद्यपान करून काच व बाटल्या रस्त्यावर फेकत असल्याचेही प्रकार घडत आहेत. अलीकडेच दापोली वनविभागाने कृषी विद्यापीठातील वनशास्त्र विद्यार्थ्यांच्या व नगरपंचायतीच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवली होती. ब्रिटिश काळापासून राखीव असलेले हे वनक्षेत्र दापोली शहरासाठी ‘संजीवनी’ ठरत आहे. मात्र, जोग नदीत टाकला जाणारा कचरा पुढे बांध तिवरे येथे साचत असून, त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे
केलासकार नाका, बीएसएनएल कार्यालय मागील भाग, जोग नदी पात्र, आझाद मैदान परिसर, एसटी स्टँड मागील भाग आदी ठिकाणीही खुलेआम कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी व आरोग्य समस्या वाढत असल्याचे पुढे आले आहे.
‘ग्रीन झोन’ विकसित करणार
वनविभागाकडून नर्सरी रोड, लालकट्टा, विद्यापीठ गेट क्रमांक १० ते जळगाव सीमा या भागात रिंग रोड ‘ग्रीन झोन’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दापोली शहर स्वच्छ, सुंदर व निसर्ग संपन्न ठेवण्यासाठी निसर्गप्रेमी, स्वयंसेवक व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
… तर संपर्क साधावा
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना किंवा मद्यपान करताना आढळल्यास संबंधितांचे फोटो काढून वनविभाग, पोलिस विभाग किंवा नगर प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 12/Jan/2026












