◼️रत्नागिरीकरांची उत्कंठा संपली; नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते बक्षीस वितरण; तृप्ती झोरे आणि डॉ. सीमा श्रीखंडे यांनीही मारली बाजी
रत्नागिरी खबरदार | विशेष प्रतिनिधी
➡️ रत्नागिरी : गेले चार दिवस संपूर्ण रत्नागिरी शहरात (Ratnagiri City) आणि सोशल मीडियावर एकाच गोष्टीची चर्चा होती, ती म्हणजे “ती १ लाखाची पैठणी कोणाला मिळणार?” अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, नशिबाचा एक अनोखा खेळ रत्नागिरीकरांनी अनुभवला आहे. ‘रत्नागिरी खबरदार’ आयोजित ‘वुमन्स कार्निव्हल २०२६’ (Women’s Carnival 2026) मधील १ लाख रुपये किमतीची शाही पैठणी जिंकण्याचा मान सौ. प्रमिला झिटे (Pramila Zhite) यांनी पटकावला आहे. विशेष म्हणजे, प्रमिला यांनी प्रदर्शनात केवळ १७५ रुपयांची खरेदी केली होती आणि याच खरेदीवर मिळालेल्या कुपनने त्यांना थेट १ लाखाच्या पैठणीची मालकीण बनवले आहे!
◼️ १७५ रुपयांत उघडले नशीब!
वुमन्स कार्निव्हलमध्ये प्रमिला झिटे यांनी ‘राघव एन्टरप्राईझेस’ (Raghav Enterprises) या स्टॉलवरून अवघ्या १७५ रुपयांची छोटीशी खरेदी केली होती. त्याबदल्यात त्यांना लकी ड्रॉ कुपन मिळाले होते. रविवारी कार्निव्हलच्या शेवटच्या दिवशी रात्री नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे (Shilpa Surve) आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ काढण्यात आला. चार दिवसांत जमा झालेल्या हजारो कुपन्स मधून आधी तीन संभाव्य विजेत्यांची निवड करण्यात आली. या तिघांमधून अंतिम चिठ्ठी प्रमिला झिटे यांच्या नावाची निघताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. १ लाखाची पैठणी आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या महाविजेत्या सोबतच इतर दोन भाग्यवान महिलांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात आली:
द्वितीय क्रमांक: सौ. तृप्ती झोरे (Trupti Zhore) या दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. त्यांना ‘मायाज धागा’ (Maya’s Dhaga) च्या संचालिका ईशा वाड्ये यांच्या वतीने तब्बल १३,५०० रुपयांची पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली.
तृतीय क्रमांक: डॉ. सीमा श्रीखंडे (Dr. Seema Shrikhande) या तिसऱ्या विजेत्या ठरल्या. त्यांना ‘मानवा’ (Manva) ब्रँडच्या संचालिका पूजा कदम यांच्या हस्ते आकर्षक गिफ्ट देण्यात आले.
◼️ अभूतपूर्व गर्दीत दिमाखदार समारोप
बक्षीस वितरण समारंभाला कार्निव्हलचे सर्व प्रायोजक, मान्यवर आणि रत्नागिरीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटचा दिवस असल्याने रविवारी सकाळपासूनच जयेश मंगल पार्कवर ग्राहकांनी तोबा गर्दी केली होती. खरेदी, खाद्य महोत्सव आणि बक्षिसांच्या लयलूटीने यावर्षीचा वुमन्स कार्निव्हल अविस्मरणीय ठरला आहे.
विजयी महिलांचे मनःपूर्वक अभिनंदन!
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:21 12-01-2026












