खेड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सतीश चिकणे यांची बिनविरोध निवड

खेड : खेड उपनगराध्यक्ष पदावर नगरपरिषदेच्या शिवसेना पक्षाचे अनुभवी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवारी दुपारी २.३० वा. निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी हे जाहीर केले. विशेष म्हणजे, खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने २१-० असा अभूतपूर्व विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली आहे.

नामनिर्देशन प्रक्रियेच्या वेळी नगर परिषद परिसरात मोठी उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवसेना पक्षाकडून उपनगराध्यक्ष पदासाठी फक्त एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने कोणत्याही प्रकारची स्पर्धा दिसून आली नाही. त्यामुळे सतीश उर्फ पप्पू चिकणे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

नामनिर्देशन दाखल करताना नगराध्यक्षा माधवी बुटाला, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण नगरपरिषदेत शिवसेनेची एकजूट आणि संघटनशक्ती स्पष्टपणे जाणवत होती. यावेळी शहरप्रमुख कुंदन सातपुते, संजय मोदी, मिनार चिखले यांच्यासह अनेक शिवसैनिक हजर होते.

२१-० या महायुतीच्या ऐतिहासिक विजयामुळे खेड नगरपरिषदेतील सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलली असून विपक्षाचा आवाज गायब झाला आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील विकासकामांबाबत निर्णय प्रक्रियेला अडथळ्याविना गती मिळण्याची शक्यता आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी नगरसेवक संजय मोदी व मिनार चिखले यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. शिवसेनेची एकहाती सत्ता आणि संघटनातील एकजूट यामुळे खेडच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरूवात झाल्याची चर्चा होत आहे. आता या नगरसेवकांकडून नागरिकांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 13/Jan/2026