देवरुख : देवरुख नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत नगरसेवक पदासाठी १४ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. उपनगराध्यक्षपदासाठी शिंदे गटाला तर स्वीकृत नगरसेवकांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपा दोन पक्षांच्या उमेदवारांना पद दिले जाणार आहे. नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये प्रत्यक्ष ही निवडणूक होणार आहे. दरम्याने राष्ट्रवादी अजित पवार गट ४ नगरसेवक व मनसेचे ३ नगरसेवक अशा ७ नगरसेवकांचा गट तयार करण्यात आला आहे. या गटातून स्वीकृत नगरसेवकांसाठीची सर्व सूत्रे आमदार शेखर निकम यांच्या हाती आहेत. या पदासाठी मनसेचे सागर संसारे यांच्या नावाला पसंती मिळत असल्याची चर्चा असून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भाजपाकडून स्वीकृत नगरसेवकांसाठी सुधीर यशवंतराव, रुपेश भागवत, शंकर मालप व चेतन पाडळकर यांची नावे वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आलली आहेत. वरिष्ठ पातळीवरून यातील एक नाव निवडणुकीपूर्वी जाहीर केले जाणार आहे. दरम्याने उपनगराध्यक्ष पदासाठी महायुतीतील शिंदे गटाचे अनुभवी नगरसेवक वैभव पवार यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
सध्या भाजपाचे ३ नगरसेवक यात अपक्ष निवडून आलेल्या कविता नार्वेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याने भाजपाचे एकूण ४ नगरसेवक अधिक शिंदे गटाचे ३ नगरसेवक असा ७ नगरसेवकांचा गट तयार झाला आहे. आघाडीतील उबाठाचे ३ नगरसेवक यांचा स्वतंत्र गट विरोधात राहणार असल्याची देखील चर्चा आहे. उपनगराध्यक्ष व २ स्वीकृत नगरसेवक यांच्या नावाची घोषणा मंगळवारी सायंकाळपर्यंत होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 13/Jan/2026














