राजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक

राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित कौन्सीलची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवारी १३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक व स्विकृत सदस्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभगृहात दुपारी २.३० वाजता ही सभा होणार आहे.

उपनगराध्यक्ष या पदासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करावयचे आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही १३ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ अशी आहे. त्यानंतर दुपारी १ ते १.१५ छाननी होणार असून त्यानंतर उमेदवारांच्या नावे जाहिर केली जाणार आहेत. त्यानंतर दुपारी १.३० ते १. ४५ या वेळेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मुदत रहाणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहिर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २.३० वाजता या निवडणूकीसाठी मतदान होऊन निकाल जाहिर केला जाणार आहे.

तर याच वेळी स्विकृत सदस्यपदासाठी निवड प्रक्रिया पुर्ण होणार आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या या स्विकृत नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांची नावे जाहिर केली जाणार आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक विनय गुरव यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर शिवसेनेकडून या पदासाठी अद्याप कुणाच्याही नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. याच सर्वसाधारण सभेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या स्विकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

सध्या तरी राजापूर नगर परिषदेत सभागृहात नगरसेवकांची संख्या समसमान आहे. यामध्ये महाविकास आघाडीडे दहा तर शिवसेनेकडे दहा नगरसेवक आहेत. मात्र नगराध्यक्षपद काँग्रेस आघाडीकडे असल्याने निर्विवाद बहुमत काँग्रेस आघाडीकडे असल्याने उपनगराध्यक्षपदाची निवडणूक आघाडीसाठी सहज सोपी आहे. मात्र या निवडणुकीत महायुतीकडून अद्यापही उमेदवाराचे नाव जाहिर करण्यात आलेले नाही. त्यामुळे महायुती उमेदवार देणार, की ही निवडणूक बिनविरोध होणार की काही चमत्कार होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 13/Jan/2026