मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शासकीय कार्यालयांसहित शैक्षणिक, औद्योगिक आणि वाणिज्यिक आस्थापनांना गुरुवार, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
यामुळं भारतीय शेअर बाजारावर बीएसई आणि एनएसईला देखील 15 जानेवारी 2026 सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एनएसईनं याबाबत परिपत्रक जारी केलं आहे.
एनएसईनं सुरुवातीला 15 जानेवारीला ट्रेडिंग सुरु राहील मात्र सेटलमेंटला सुट्टी असेल, असं सांगितलं होतं. मात्र, निर्णय बदलत एनएसईनं कॅपिटेल मार्केटमधील ट्रेडिंगला सुट्टी जाहीर केली आहे. इक्विटी, इक्विटी डेरिवेटिव्ज, इंटरेस्ट रेट डेरिवेटिव्ज आणि सिक्युरिटीज लेंडिंग बॉरोइंगमध्ये देखील ट्रेडिंग होणार नाही.
महाराष्ट्र शासनाने अधिसूचना तसेच 15 जानेवारीच्या सुट्टीनिमित्त शासन परिपत्रक नुकतेच निर्गमित केले आहे. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात म्हटले आहे.
ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. मतदारांनी मतदानासाठी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.
शेअर बाजाराला 2026 मध्ये किती दिवस सुट्टी?
शेअर बाजाराला 2026 मध्ये 16 सुट्ट्या असणार आहेत. यापैकी चार सुट्ट्या शनिवार आणि रविवारी आहेत. शनिवारी आणि रविवारी शेअर बाजाराला सुट्टी असतेच. मार्च महिन्यात होळी (3 मार्च), श्रीराम नवमी (26 मार्च), महावीर जयंतीला (31 मार्चला) सुट्टी असेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 13-01-2026














