देवरुख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी विनापरवाना ‘तिरडी यात्रा’ काढून महामार्ग रोखल्याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी सुमारे ३५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये देवरुख, मुंबई आणि पनवेल येथील सहा नामनिर्देशित व्यक्तींसह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१) (३) अन्वये मनाई आदेश लागू आहे. या आदेशाचे उल्लंघन करून, विनापरवाना जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली.
याप्रकरणी पोलिसांनी अशोक जाधव (देवरुख), युयुत्सू आर्ते (देवरुख), सुरेंद्र सुभाष पवार (मुंबई), रुपेश रामचंद्र दर्गे पनवेल अनिकेत प्रदिप मेस्त्री (मुंबई), संजय अनिल जंगम (मुंबई) आणि इतर ३० ते ३५ अज्ञात कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पुढील तपास श्रेणी पोलिस उपनिरीक्षक आर. एस. गावित करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 13/Jan/2026














