रत्नागिरी : आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजने अंतर्गत सन २०२३-२४ मधील जिल्ह्यात प्रथम क्रमांक राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या ग्रामपंचायतीने ४० लाखांचा प्रथम पुरस्कार पटकावला असून, लवकरच ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात येणार आहे.
आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजने अंतर्गत लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा विकास करून पर्यावरणाचा समतोल राखणे, समृद्ध ग्राम निर्माण करणे व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या ग्रामस्तरीय योजनांची सांगड घालून योजनांचा समन्वय करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या पुरस्कारासाठी तालुकास्तरावर मंडणगड तालुक्यातील गोठे ग्रामपंचायत, दापोलीतील टाळसुरे ग्रामपंचायत, खेडमधील गुणदे, चिपळुणातील पिंपळी बुद्रूक ग्रामपंचायत, गुहागरमधील चिखली ग्रामपंचायत, संगमेश्वरातील कोळंबे ग्रामपंचायत, रत्नागिरीतील कुरतडे ग्रामपंचायत, लांजामधील रावरी आणि राजापूर तालुक्यातील कळसवळी ग्रामपंचायत यांची निवड करण्यात आली होती.
त्यानंतर ९ तालुक्यात प्रथम आलेल्या ९ ग्रामपंचायतींमध्ये जिल्हास्तरावर निवड करून कळसवळी ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या योजनेमध्ये प्रथम तालुकास्तरावर आलेल्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख रुपयांचे पारितोषिक, तर जिल्हास्तरावरील कळसवळी ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे ४० लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यातून गावात आणखी विकास कामे केली जाणार आहेत.
या सोयीसुविधा हव्यात
वैयक्तिक शौचालय सुविधा व वापर करणे, सार्वजनिक इमारतीमधील शौचालय सुविधा व वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षणविषयक, बचत गट तसेच प्लास्टिक वापर बंदी, वृक्ष लागवड, सौर पथदिवे, जलसंधारणाची कामे, बायोगॅस संयंत्रणाचा वापर या सोयीसुविधा ग्रामपंचायतींमध्ये असणे आवश्यक आहे. या सर्व सोयीसुविधांची तपासणी करण्यात येते. याची पाहणी जिल्हास्तरीय समितीने केली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 13/Jan/2026














