रत्नागिरी : दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांतील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याबाबत राज्य मंडळाने सूचना केली आहे. त्यानुसार कोकण विभागीय मंडळांतर्गत १७५ केंद्रांपैकी ७० केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील १११ केंद्रांपैकी ३३ तर सिंधुदुर्गातील ६४ केंद्रांपैकी ३४ केंद्रांवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
कोकण मंडळांतर्गत १७५ पैकी ७० परीक्षा केंद्रांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, उर्वरित १०५ परीक्षा केंद्रांच्या संस्थाचालक व प्राचार्यांना बैठका घेऊन पुढील दहा दिवसांत कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ७५ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० शाळांचा समावेश आहे. गैरप्रकार मुक्त परीक्षेसाठी यावर्षी सर्वच परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक व कर्मचारी यांची अदलाबदल करण्यात येणार आहे.
यावर्षी बारावीची लेखी परीक्षा दि. १० फेब्रुवारी ते दि. १८ मार्च या कालावधीत होणार आहे. त्यापूर्वी तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा दि. २३ जानेवारी ते दि. ९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे. दहावीची लेखी परीक्षा दि. २० फेब्रुवारी ते दि. १८ मार्च या कालावधीत होणार असून, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा दि. २ ते दि. १८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
फुटेज दक्षता समितीकडे देणार
विभागीय मंडळ स्तरावर उपद्रवी व संवेदनशील परीक्षा केंद्रांची यादी निश्चित करण्यात येणार आहे. विभागीय मंडळांतर्गत संवेदनशील परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्हीचे ऑनलाइन फुटेज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती यांच्याकडे देण्यात येणार आहे. परीक्षांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य मंडळ व विभागीय मंडळ कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षातून कॅमेराद्वारे किती संवेदनशील परीक्षा केंद्रांना जोडता येईल, याबाबतची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळेल तिथे तत्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येणार आहे.
दहावी, बारावी परीक्षेची सर्वसमावेशक तयारी सुरू आहे, शाळास्तरावरील तयारीची पाहणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे-राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळ
परीक्षेसाठी निश्चित केलेल्या सर्व केंद्रांवर परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर बसणार आहेत, त्या परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती परीक्षा केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्यात येणार आहे.
चालू वर्ष समितीचे पुनर्गठन करण्यात चालू वर्षी जिल्हास्तरीय दक्षता आले असून, संबधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती काम करणार आहे. त्यात वीज वितरणचे कार्यकारी अभियंता यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:22 PM 13/Jan/2026














