रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन प्रतिसाद’: ज्येष्ठ नागरिकांसाठी ठरतेय ‘आधारवड’! एका कॉलवर २०० हून अधिक समस्यांचे १००% निवारण

◼️ पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा स्तुत्य उपक्रम; ‘त्या’ दोन हेल्पलाईन नंबरवर कॉल करताच पोलीस पोहोचणार मदतीला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या (Ratnagiri District) दुर्गम भागात राहणाऱ्या किंवा घरात एकटे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा ‘मिशन प्रतिसाद’ (Mission Pratisad) हा उपक्रम खऱ्या अर्थाने आधारवड ठरत आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे (SP Nitin Bagate) यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत २०३ हून अधिक ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे १०० टक्के निवारण करण्यात आले आहे.नेमके काय आहे ‘मिशन प्रतिसाद’? रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने १० सप्टेंबर २०२५ पासून हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. दुर्गम भागात वास्तव्य करणारे आणि मदतीची गरज असलेले ज्येष्ठ नागरिक यांना तात्काळ पोलीस मदत उपलब्ध करून देणे, हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. यासाठी जिल्हा पोलीस दलाने एक स्वतंत्र आणि समर्पित कक्ष स्थापन केला असून तेथे ०४ पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी खास हेल्पलाईन या मिशन अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन स्वतंत्र मोबाईल हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत: ९६८४७०८३१६ (9684708316) ८३९०९२९१०० (8390929100)

कारर्यपद्धती कशी आहे? १. कॉल करणे: ज्येष्ठ नागरिकांनी वरील क्रमांकावर किंवा ‘डायल ११२’ वर कॉल करून आपली समस्या सांगायची आहे. २. तात्काळ दखल: कॉल प्राप्त होताच संबंधित माहिती त्या भागातील पोलीस ठाण्याला दिली जाते. ३. घरपोच मदत: पोलीस अधिकारी किंवा बीट अंमलदार प्रत्यक्ष तक्रारदार आजी-आजोबांच्या घरी भेट देऊन त्यांच्या समस्येचे निराकरण करतात. ४. फीडबॅक (Feedback): समस्या सुटल्यानंतर ‘मिशन प्रतिसाद’ कक्षातून पुन्हा त्या नागरिकाला फोन करून “तुमची अडचण दूर झाली का?” याची खात्री केली जाते. खात्री झाल्यानंतरच तक्रार बंद (Close) केली जाते.२०३ तक्रारींचे यशस्वी निवारण आजपर्यंत या मिशन अंतर्गत २०३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्वांचे १००% निवारण करण्यात आले आहे. यामध्ये मुलांनी केलेली मारहाण, रेशन न मिळणे, आर्थिक फसवणूक, ध्वनि प्रदूषण, सामाजिक बहिष्कार आणि वैद्यकीय मदत अशा विविध तक्रारींचा समावेश होता.SP स्वतः घेतात आढावा या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी हे दररोज या कक्षाचा आढावा घेतात. प्रसंगी पोलीस अधीक्षक स्वतः ज्येष्ठ नागरिकांशी फोनवर संवाद साधून समाधानाची खात्री करतात. रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही संकटात या हेल्पलाईनचा निर्भयपणे वापर करावा, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 14-01-2026