आज मकर संक्रांती नवीन वर्षातील पहिला सण!

रत्नागिरी : नवीन वर्ष सुरू झाले असून, दुसऱ्याच आठवड्यात हिंदू धर्माचा पवित्र सण म्हणून मकर संक्रांतीकडे पाहिले जाते. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तीळ, भुईमूग पिकांचे नुकसान झाल्यामुळे व उत्पादन कमी झाल्याने महागाई वाढली आहे. ऐन संक्रांतीच्या काळात तीळगुळाबरोबरच शेंगदाणे, गुळासह वाणाच्या किंमतीत वाढ झाली आहे. महागाई वाढली तरी महिलांची साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे. १४ जानेवारी रोजी संक्रांती साजरी केली जाणार आहे.

संक्रांत सणाला तीळ आणि गूळ यांना विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्व आहे. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला या संदेशासह नातेसंबंध दृढ करण्याची परंपरा या सणाशी जोडलेली आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ सजली आहेत. संक्रांतीसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

शहरातील मारूती मंदिर परिसर, गोखले नाका, धनजी नाका तसेच प्रमुख रस्त्यांवरील बाजारपेठांमध्ये सोमवारी सकाळपासूनच ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. संक्रांतीसाठी लागणाऱ्या वाण, हळदी-कुंकू, तीळगूळ तसेच रानमेव्याच्या खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत विशेष गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.

छोट्यापासून ते मोठ्या व्यावसायिकांनी दुकानांची मांडणी, सजावट केली आहे. मातीच्या सुगड्यांची दुकाने, हळदी-कुंकू समारंभासाठी लागणारे साहित्य तसेच टहाळ, बोर, वाळुक, ऊस, जांभूळ, बिब्याची फुले, गाजर, वाटाण्याच्या शेंगा या रानमेव्यांची विक्री सुरू आहे.

मकर संक्रांतीला हलवा किंवा तीळगूळ, वड्या, लाडू, पोळी तयार करण्यात येतात किंवा रेडिमेड खरेदी केली जाते. मात्र यावर्षी तीळ, गूळ, शेंगदाण्याच्या दरात वाढ झाल्यामुळे रेडिमेड तीळगूळही महागला आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 14/Jan/2026