लांजा : महावितरणकडून बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सोमवारी लांजा येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. महावितरणच्या या भूमिकेला लांजा तालुक्यातुन तीव्र विरोध असून घरामध्ये कुणीही उपस्थित नसतानाही जुने मीटर बदलण्याचा प्रकार महावितरणकडून सुरू असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेकडून करण्यात आला. स्मार्टमीटरच्या विरोधात संतप्त झालेल्या लांजातील नागरिकांनी आपल्या तक्रारी शिवसैनिकांकडे मांडल्यानंतर शहरप्रमुख मोहन तोडकरी यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सोमवारी लांजा येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली.
यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शिवसेनेकडून यापूर्वीही महावितरणकडे वारंवार पत्रव्यवहार करून स्मार्ट मीटर बसवण्याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. मात्र संबधित प्रशासनाची स्मार्ट मीटर विषयी वारंवार बदलणारी भूमिका आणि महावितरणकडून सुरू असलेली जोर जबरदस्तीची अंमलबजावणी ही जनतेची गळचेपी करणारी असल्याचा आरोप युवा तालुका अधिकारी अभिजीत राजेशिर्के यांनी केला.
याप्रसंगी लांजा शहरप्रमुख मोहन तोडकरी, युवा अधिकारी अभिजीत राजेशिर्के, सचिन लिंगायत, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबू गुरव, सुजित भुर्के, बाबा धावणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 14/Jan/2026














