खेड : खेडमध्ये भारतीय वायुसेनेच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांचे थरारक हवाई प्रात्यक्षिक पाहण्याची दुर्मीळ संधी नागरिकांना मिळणार आहे. लायन्स क्लब ऑफ खेड व शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने २३ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत पाटीलदार भवन शेजारील मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती शिवचैतन्य पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी व लायन्स क्लब अध्यक्ष महेंद्र शिरगावकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, हवाई प्रात्यक्षिकात भारतीय वायुसेनेची मिराज-२०००, तेजस, राफेल व सुखोई-३० ही अत्याधुनिक आरसी फायटर विमाने सहभागी होणार आहेत. टेक-ऑफ, आकाशातील वेगवेगळ्या हालचाली, उंच झेप, स्टंट रोल, राफेल रोल, उलटे फ्लाइंग, स्फिन, तसेच क्षणार्धात जमिनीवर झेपावत पुन्हा आकाशात झेप घेण्यासारखी कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. अवघ्या ५० ते २०० फूट उंचीवरून होणाऱ्या या हालचाली प्रेक्षकांसाठी अतिशय रोमांचक ठरणार आहेत.
याशिवाय ध्वनीभंग करत उडणारे जेट्स, नाचणारा मासा, उडती तबकडी, बॅनर व रंगीबेरंगी पताकांच्या साहाय्याने केले जाणारे हवाई प्रदर्शन, तसेच विविध प्रकारच्या नौदल विमानांची माहिती देणारे प्रात्यक्षिकही पाहायला मिळणार आहे. या शोमधून विमानतंत्रज्ञान व विज्ञानाची सोप्या शब्दांत माहिती दिली जाणार असून, विद्यार्थ्यांमध्ये विमानविज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण होण्याचा उद्देश आहे. अरविंद तोडकरी व महेंद्र शिरगावकर यांनी खेड परिसरातील विद्यार्थी, पालक व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. या पत्रकार परिषदेला पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय महाजन, मिलिंद इवलेकर, परेश चिखले, लायन्स क्लब जिल्हा समन्वयक रोहन विचारे, डॉ. विक्रांत पाटील, शैलेश धारिया आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 14/Jan/2026














