मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आबलोली ग्रामपंचायतीत नाविन्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ

आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली निर्मल ग्रामपंचायतीतर्फे गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गुहागर तालुक्यामधील सर्वात प्रथम नाविन्यपूर्ण उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ आबलोली गावात करण्यात आला आहे.

आबलोली ग्रामपंचायतीतर्फे गावातील सर्व समाज घटकांना एकत्रित करून प्लास्टिक बंदीवर प्रभावीपणे उपाययोजना करण्यासाठी कापडी पिशवी वेडिंग मशीन आबलोली गावात मुख्य बाजारपेठेत बसवण्यात आली असून या मशीनमध्ये १० रुपयांचा कॉइन टाकल्यानंतर कापडी पिशवी बाहेर येते. त्यामुळे ग्रामस्थांसह ग्राहकांना कापडी पिशवी वापराची सवय होईल आणि प्लास्टिक बंदीला कापडी पिशवीचा पर्याय राहील आणि निसर्गाचे संरक्षण देखील होईल.

तसेच ओला कचरा (टाकाऊ पदार्थांपासून) डीकंपोज खत निर्मिती करणारी डीकंपोज खत निर्मिती मशीनही आबलोली गावात बसवण्यात आले आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी पॅड / नॅपकिन वेडिंग मशीन सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात आली आहे.

आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांना एकत्र घेऊन आबलोली गावात लोकसहभागातून लोक चळवळ उभी करून विकास कामांबरोबरच आरोग्य विषयक विविध कामे मार्गी लागत आहेत. तसेच १५ वित्त आयोगामधूनही आबलोली गावात विकास कामे होत आहेत. याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 14/Jan/2026