मंडणगड : तालुक्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आंबा व काजू मोहर संरक्षण विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा तालुक्यातील मौजे वेशवी येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला बाणकोट पंचक्रोशीतील आंबा व काजू उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या कार्यशाळेत शेतकऱ्यांना मोहर संरक्षणाबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. शिंदे यांनी आंबा व काजू पिकांवरील मोहर अवस्थेतील रोग व किडींचे व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक उपाययोजना, योग्य फवारणी वेळापत्रक तसेच उत्पादन वाढीसाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे देत प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे माहिती दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी एस. बी. आहेरकर यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजना, अनुदान योजना, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा व त्यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत माहिती दिली. तसेच, देव्हारेचे मंडळ कृषी अधिकारी आर. एस. मर्चडे यांनी आंबा पुनरुज्जीवन योजना व मागेल त्याला काजू योजनेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहागावचे उप कृषी अधिकारी एस. एम. पवार यांनी केले. वेशवीचे सहायक कृषी अधिकारी ए. डी. तळेकर यांनी आभार मानले. कार्यशाळेला वेशवी ग्रामपंचायतीच्या सरपंच बाणकोट खाडे, ग्रामपंचायतीचे सरपंच नुरुल्लाह परकार, वेळास ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी पाटील उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 14/Jan/2026














