मबंई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वर्ग करण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे; मात्र अजूनही राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत.
त्यामुळे या लाडक्या बहिणी जराशा नाराज झाल्या आहेत. लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेची केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 इतकी होती. पण केवायसी करून देखील नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे अनेक लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत.(Ladki Bahin Yojana)
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या नेमक्या काय आहेत अडचणी?
मुंबईत राहणाऱ्या चंचल यादव सांगतात की, “लाडकी बहीण योजनेची केवायसी केली होती. परंतु मला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर लॉगिन करण्याचा प्रयत्न करत आहे,पण ओटीपी देखील येत नाही. त्यामुळे पैसे न येण्याचं कारण काय? हे समजत नाही.”(Ladki Bahin Yojana)
तर छत्रपती संभाजीनगरमधल्या, तैसीम पठाण सांगतात की, “मी गृहिणी आहे, आमच्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी गाडी देखील नाही, आम्ही केवायसी देखील केली होती, पण तरीही आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत.”
तर पुण्यात राहणाऱ्या सोनी घोटकर सांगतात की, “मला दोन महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीत. काल अनेक महिलांच्या खात्यात पैसे आले, मी माझे सर्व बँक खाते चेक केलेत, पण मला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही. केवायसी करून देखील सरकार आमच्यासोबत असं का करतय?” असा सवाल सोनी घोटकर यांनी सरकारला केला आहे.
राज्यात अनेक लाडक्या बहिणींनी केवायसी करून देखील त्यांना योजनेचे पैसे मिळाले नाहीत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, आम्ही पात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन हप्ते वर्ग केले आहेत. महापालिका निवडणूक मतदानाच्या आधीच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान, दोन महिन्याचे एकत्रच पैसे जमा करण्यात येणार होते. परंतु, अग्रिम रक्कम जमा करण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केल्याने सरकारने केवळ डिसेंबर महिन्याचा निधी वितरित केला आहे.
Ladki Bahin Yojana: जानेवारीचा हप्ता कधी येणार?
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजनेतील दोन हप्ते एकत्र देण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. यावेळीही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा निधी एकत्र वितरित करण्यात येणार होता. मात्र, विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला. काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार, सरकारने आता फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा नियमित हप्ता पाठवला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता पाठवण्यात आलेला नाही. आता, जानेवारीचा हप्ता केव्हा येणार, याबाबत सरकारकडून अद्यापही स्पष्टीकरण आलेलं नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:40 14-01-2026














