देशाच्या आर्थिक विकासात नारळ पिकाचे योगदान फार मोठे : महाराष्ट्र नारळ केंद्राचे उपसंचालक एन. गुरुराज

रत्नागिरी : देशाच्या आर्थिक विकासात नारळ पिकाचे योगदान मोठे आहे. नारळ पिकाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न घेता येऊ शकते. नारळाची उत्पादकता आणि उत्पादन वाढविण्यासाठी मंडळाच्या विविध योजनांचा बागायतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नारळ विकास मंडळाच्या महाराष्ट्र केंद्राचे उपसंचालक एन. गुरुराज यांनी केले.

भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय विभागाच्या नारळ विकास मंडळाचा ४६ वा स्थापना दिवस भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात एन. गुरुराज बोलत होते. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत नारळ पिकाचे योगदान उपस्थितांना पटवून सांगितले.

प्रास्ताविकात मंडळाचे विकास अधिकारी रवींद्र कुमार यांनी नारळ विकास मंडळाची उद्दिष्टे, कार्यप्रणाली याबाबत माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी नारळ पिकासंदर्भात राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना, नारळ पीक संवर्धन याबाबत माहिती दिली. नारळ उद्योजक तुषार आग्रे यांनी नारळ काढणीपासून प्रक्रियेपर्यंत उद्योजक कसे निर्माण झाले पाहिजेत, याबाबत मार्गदर्शन केले.

नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे यांनी नारळ उत्पादन, उत्पादकता याची सद्य:स्थिती आणि भविष्यातील विकासाच्या दिशा यावर मार्गदर्शन केले. कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम आयोजनामध्ये नारळ विकास मंडळाच्या ठाणे येथील कार्यालयातील तंत्र अधिकारी विपिन यांच्यासह संशोधन केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई या जिल्ह्यांतून शेतकरी व उद्योजक उपस्थित होते. याप्रसंगी नारळाच्या विविध जाती, उत्पादने याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला बागायदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ. किरण मालशे, डॉ. संतोष वानखेडे, रवींद्र कुमार यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले; तसेच बागायतदारांच्या शंकांचे निरसन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 14/Jan/2026