चिपळूण : पोफळी येथील कोयना जलविद्युत केंद्राला २५ वर्षानंतर प्रथमच महानिर्मिती कंपनी अंतर्गत विद्युत केंद्राच्या नाट्य स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात १९ जानेवारीपासून स्पर्धा सुरू होणार आहे.
या स्पर्धेसाठी नाशिक, चंद्रपूर, परळी, भुसावळ, कोराडी, उरण, मुंबई, खापरखेडा आदी भागातील स्पर्धक यानिमित्ताने चिपळूणला येणार आहेत. महानिर्मिती कंपनी अंतर्गत विद्युत केंद्राची ही स्पर्धा दरवर्षी राज्याच्या वेगवेगळ्या भागात घेतली जाते. मात्र, यावर्षी ही स्पर्धा भरवण्याचा मान पोफळी येथील कोयना जलविद्युत केंदाला मिळाल्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कोयना संकुलचे अधिकारी व कर्मचारी कामाला लागले आहेत.
या स्पर्धेची माहिती देताना कोयना जलविद्युत केंद्राचे मुख्य अभियंता आणि नाट्यस्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संजय चोपडे म्हणाले, २३ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष राधाकृष्णन वी यांच्या हस्ते १९ जानेवारीला सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उदघाटन होईल. यावेळी महानिर्मिती कंपनीचे संचालक विश्वास पाठक, संजय मरूडकर, अभय हरणे, मनेष वाधौरकर, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, राजेश पाटील, नितीन वाघ, नितीन चांदुरकर आणि मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरूषोत्तम वारजुरकर उपस्थित राहणार आहेत.
दररोज दोन नाटकं सादर केली जाणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सकाळी १०.३० वाजता कोयना जलविद्युत केंद्राचे ‘कार्टी न वन’ हे नाटक होणार आहे. सांयकाळी ५.३० वाजता पारस औष्णिक वीज केंद्राचे ‘बातमीची गोष्ट’ हे नाटक होणार आहे. व २० जानेवारीला सकाळी १० वाजता चंद्रपूर औष्णिक केंद्राचे ‘अनंनिमस’ तर सांयकाळी ५.३० वाजता भुसावळे औष्णिक केंद्राचे ‘धुम्मस’ हे नाटक होईल. २१ रोजी सकाळी १० वा. नाशिक औष्णिक केंद्राचे ‘बदाम सात तर सांयकाळी परळी औष्णिक केंद्राचे ‘अजूनही उजाडत नाही’ हे नाटक होईल. २२ रोजी सकाळी १० वाजता कोराडी औष्णिक वीज केंद्राचे ‘द रेन इन द डार्क’ तर सायंकाळी उरण औष्णिक वीज केंद्राचे ‘रंगसावल्या’ हे नाटक होणार आहे. रसिकांनी या नाटकांचा आवर्जून आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:00 PM 14/Jan/2026














