रत्नागिरी : जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश पोहोचवणारे आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे (The Art of Living) प्रणेते गुरूदेव श्री श्री रविशंकरजी (Gurudev Sri Sri Ravi Shankar) हे कोकणच्या इतिहासात प्रथमच रत्नागिरीत येत आहेत. त्यांच्या पावन उपस्थितीत येत्या २२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर कॉलेजच्या भव्य मैदानावर ‘भक्ती उत्सव’ (Bhakti Utsav) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ऍड. सौ. जया सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ज्ञान, ध्यान आणि सुरांचा मिलाफ
गुरूदेव श्री श्री रविशंकरजी यांचे सत्संग हे नेहमीच देश-विदेशातील मोठ्या शहरांमध्ये होत असतात. मात्र, कोकणात आणि विशेषतः रत्नागिरीत त्यांचे आगमन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या या सत्संगात ज्ञान, ध्यान आणि भजन असा त्रिवेणी संगम रत्नागिरीकरांना अनुभवायला मिळणार आहे. गुरूदेवांचे दर्शन आणि त्यांच्या वाणीतून मार्गदर्शन मिळणे, ही रत्नागिरीकरांसाठी एक मोठी पर्वणी असणार आहे.
२० ते २५ हजार भाविकांची उपस्थिती
हा कार्यक्रम ‘न भूतो न भविष्यती’ असा भव्य स्वरूपात होणार असून, यासाठी रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, पुणे आणि इतर अनेक जिल्ह्यांतून सुमारे २० ते २५ हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सोहळ्यासाठी पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे विशेष सहकार्य लाभले असून, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेकजण स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहेत.
सुदर्शन क्रियेने विश्वाला तणावमुक्त करणारे गुरूदेव
गुरूदेव श्री श्री रविशंकरजी यांनी भारतीय संस्कृतीतील प्राणायाम, ध्यान आणि योग यांसारख्या अमूल्य ठेव्याचा प्रसार करून प्रत्येक मनुष्याला निर्भय बनवण्याचे कार्य केले आहे. त्यांनी शोधलेल्या ‘सुदर्शन क्रिया’ (Sudarshan Kriya) या क्रांतीकारक तंत्रामुळे आज जगभरातील लाखो लोक तणावमुक्त जीवन जगत आहेत. रत्नागिरीतही गेल्या अनेक वर्षांपासून आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्य अविरत सुरू असून, अनेकांनी याचा लाभ घेतला आहे.
रत्नागिरीकरांना सहभागी होण्याचे आवाहन
गुरूदेव श्री श्री रविशंकरजींच्या दिव्य अस्तित्वाची अनुभूती घेण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी रत्नागिरीकरांनी या महासत्संगाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ऍड. जया सामंत यांनी केले आहे.
यांची होती उपस्थिती
या पत्रकार परिषदेला आर्ट ऑफ लिव्हिंग टीमच्या सौ. विनिता गोखले, सौ. भुवना महागांवकर, सौ. प्राची देशपांडे, प्राची जोशी, श्री. राजेश भुर्के, श्री. निलेश मिरजकर, श्री. प्रविण डोंगरे, सौ. श्वेता भट, श्री. ओंकार फडके आदी मान्यवर उपस्थित होते.
📅 कधी? २२ जानेवारी | सायंकाळी ६ वाजता 📍 कुठे? गोगटे जोगळेकर कॉलेज मैदान, रत्नागिरी.













