Shashikant Warishe Murder Case : पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण: आरोपी आंबेरकरला अल्पकालीन जामीन

रत्नागिरी : राजापूर येथील पत्रकारा शशिकांत वारिशे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकरला 6 आठवड्याचा अल्पकालीन जामीन मंजूर झाला आह़े. वैद्यकीय कारणासाठी आंबेरकर याने जामीनासाठी रत्नागिरी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होत़ा. न्यायालयाने त्याला सशर्थ जामीन मंजूर केल़ा रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिल़ा.

राजापुर तालुक्यातील कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारिशे याचा थार गाडीखाली चिरडून खून केल्याप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरुद्ध भादंवि कलम 302 नुसार राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा. तसेच 7 फेब्रुवारी 2023 रोजी पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली होत़ी. आंबेरकर याने न्यायालयात एकूण तीन वेळा जामीन अर्ज दाखल केले असून ते सर्व अर्ज फेटाळण्यात आले होत़े वैद्यकीय कारणास्तव आंबेरकर याच्याकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होत़ा.

आंबेरकर याच्याकडून न्यायालयापुढे सांगण्यात आले की, खूनाचा खटला चालू असून आजपर्यंत 17 सरकारी साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या साक्षीदारांच्या जबाबांतून ओणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. तपास अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे त्याला खोट्या प्रकरणात गोवले असल्याचा आहे. यामुळे आंबेरकर प्रचंड मानसिक तणावाखाली असून सादर वैद्यकीय अहवालांवरून तो मानसिक आघाताने ग्रस्त आह़े. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव जामिनावर मुक्त करण्याची विनंती करण्यात आली.

तपास अधिकाऱ्यांनी आपले म्हणणे सादर करून अर्जास तीव्र विरोध केला आहे. गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून यापूर्वीचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. अर्जदाराचा गुन्हेगारी इतिहास आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील जामीन अर्ज फेटाळला आहे. अर्जदाराची राजकीय पार्श्वभूमी असून तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो किंवा त्यांना प्रलोभन देऊ शकतो. तो पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज फेटाळावा अशी विनंती करण्यात आली.

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, आंबेरकर याच्याविरुद्ध आरोप गंभीर स्वरुपाचा आह़े. अर्जदाराची राजकीय पार्श्वभूमी आहे व खटला अर्धवट सुरू आहे. आरोपी देखील माणूस आहे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय कारणांवरून गंभीर गुह्यातही जामीन देण्यात आल्याचे न्यायनिवाडे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे कठोर अटी घालून आरोपीस सहा आठवडय़ांचा अल्पकालीन जामीन देणे योग्य ठरेल, असे न्यायालयाने आपल्या निकालात नमुद केल़े.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 15-01-2026