खेडमध्ये फेब्रुवारीत जिल्हास्तरीय नाट्य अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

चिपळूण : सहजीवन शिक्षण संस्था संचलित आयसीएस महाविद्यालय, खेड तालुका पत्रकार संघ आणि लिटिल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत खेड येथे जिल्हास्तरीय नाट्य अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमुळे नवोदित कलाकारांना नाटकासह चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती तालुका पत्रकार संघाचे सल्लागार उत्तमकुमार जैन यांनी दिली. या कार्यशाळेत प्रख्यात अभिनेते-दिग्दर्शक-निमति डॉ. विजय केंकरे, अभिनेते-दिग्दर्शक संजय क्षेमकल्याणी आणि लेखक दत्ता सावंत प्रशिक्षणार्थीना रंगभूमीवरील तसेच चित्रपटातील अभिनयाचे मार्गदर्शन करणार आहेत. यामधून निवडक नवोदित कलाकारांना नाटक व चित्रपटात काम करण्याच्या संधीही मिळणार आहेत.

कार्यशाळेच्या निमित्ताने संस्था कार्याध्यक्ष मंगेश बुटाला, संस्था उपाध्यक्ष व एमबीए महाविद्यालयाचे चेअरमन नंदकुमार गुजराथी, महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन अॅड. आनंद भोसले, विश्वस्त विलास बुटाला यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत पहिल्या ५० प्रशिक्षणार्थीना प्राधान्य देण्यात येणार असून सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी उत्तमकुमार जैन, समन्वयक अनुज जोशी यांच्याकडे संपर्क साधावा. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था कार्याध्यक्ष मंगेश बुटाला, बालरंगभूमी संवर्धन समितीचे प्रवर्तक रघुनाथ कासेकर आणि तालुका पत्रकार संघाचे सचिव किशोर साळवी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 15/Jan/2026