खेड : भरणे-खेड-दापोली या राज्य मार्गाचे कोट्यवधींचा निधी वापरून रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या कामात महावितरणच्या विजेच्या खांबांचा मोठा अडसर निर्माण झाला असून त्यामुळे काम वेळेत पूर्ण होण्याबाबत शंका निर्माण झाली आहे.
भरणे, खेड ते थेट दापोलीपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यालगत विजेचे खांब उभे असून भरणे-खेड मार्गावर तर काही खांब थेट रस्त्याच्या मधोमध असल्याचे चित्र आहे. यामुळे रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम ठप्प होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, हे विजेचे खांब व विद्युत रोहित्र उभारताना महावितरणने संबंधित बांधकाम किंवा रस्ता यंत्रणांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप होत आहे. असे असतानाही आता हे खांब व विद्युत रोहित्र स्थलांतरित करण्यासाठी महावितरणकडून सरकारी यंत्रणांकडे मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याने वाद निर्माण झाला आहे.
या आर्थिक अडचणीमुळे रस्त्याचे सुरू असलेले काम रखडण्याची शक्यता असून याचा थेट फटका नागरिकांना बसणार आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास प्रवाशांना वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि दैनंदिन त्रास सहन करावा लागणार आहे. महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने समन्वय साधून विजेचे खांब व रोहित्र स्थलांतरित करावेत, अशी अन्यथा या मार्गावरील विकासकामे दीर्घकाळ रखडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
वीज खांब वेळेत बाजूला होणे आवश्यक …
भरणे ते खेड मार्गावर दोन टप्प्यात विजेचे खांब असून त्यामध्ये अन्नाचा पऱ्या पर्यंत रस्त्याचे काम वेगाने सुरू असल्याने तेथील वीज खांब तातडीने बाजूला करणे आवश्यक आहे. तर काम आणखी वेगाने पूर्ण करता येईल. नुकत्याच झालेल्या बैठकीत देखील याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे, अशी माहिती बांधकाम विभागातील अभियंता नीलेश पावशे यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 15/Jan/2026












