गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिरात 19 जानेवारीपासून माघी गणेशोत्सव

गणपतीपुळे : प्रतिवर्षाप्रमाणे गणपतीपुळे येथील श्री देव गणपती मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी या कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शके १९४७, सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२६ ते रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ या कालावधीत हा उत्सव संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचे वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. यानिमित्ताने देवस्थान समितीकडून अतिशय नेटके नियोजन व आयोजन करण्यात आले असून सोमवार, दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत श्रींची महापूजा व प्रसादाने उत्सवाची सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत गणेशयाग देवता स्थापना करण्यात येणार आहे. सोमवार ते शुक्रवार, दिनांक १९ ते २३ जानेवारी दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ७.३० या वेळेत सामुदायिक आरती व मंत्रपुष्प होणार असून त्यानंतर सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ह.भ.प. श्री श्रीपाद उर्फ विनोदबुवा खोंड (रा. उमरेड, जि. नागपूर) यांचे कीर्तन या कालावधीत होणार आहे. मंगळवार दिनांक २० जानेवारी रोजी माघ शुद्ध द्वितीया दिनी सकाळी ७ ते १२ या वेळेत कलशारोहण व वर्धा पनदिनानिमित्त गणेशयागाची पूर्णाहुती होणार आहे. बुधवार, दिनांक २१ जानेवारी रोजी दुपारी ११ ते १२ या वेळेत सहस्त्र मोदक समर्पणाचा धार्मिक विधी पार पडणार आहे.

गुरुवार दिनांक २२ जानेवारी रोजी माघी यात्रेनिमित्त दुपारी ४ ते ६ या वेळेत श्रींची पालखी प्रदक्षिणा (मिरवणूक) काढण्यात येणार असून भाविकांसाठी हा विशेष आकर्षणाचा क्षण ठरणार आहे. शनिवार दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता नमिला गणपती या भावगीते नाट्यगीते व भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्री. अभिषेक काळे (सांगली) व सौ. संपदा माने (मुंबई) हे कलाकार सादरीकरण करणार आहेत.

रविवार दिनांक २५ जानेवारी रोजी रथ सप्तमीच्या दिवशी दुपारी ११.३० ते २ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी रात्री ठीक १० वाजता श्रीनिवास भणगे लिखित शांतचं कार्ट चालू आहे हे धमाल विनोदी नाटक गणेश प्रासादिक नाट्यमंडळ, गणपतीपुळे यांच्यावतीने सादर करण्यात येणार असून यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 15/Jan/2026