रत्नागिरी : ”प्ले पिरीयड” बोर्ड गेमच्या माध्यमातून मासिक पाळीचे धडे

रत्नागिरी : मासिक पाळी हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक आणि महत्त्वाचा टप्पा; मात्र, योग्य माहितीअभावी आजही या विषयावर समाजात ‘गुपचिळी’ पाळली जाते. हीच भीती आणि संकोच दूर करण्यासाठी रत्नागिरीतील शाळांमध्ये एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

रॉयल अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या (UK) फ्रंटियर्स चॅम्पियन प्रकल्पांतर्गत कविता सावंत आणि दिव्या सुब्रमण्यम् या दोघींनी ‘प्ले पिरियड’ हा अभिनव बोर्ड गेम विकसित करून विद्यार्थिनींमध्ये जनजागृती सुरू केली आहे. २०२३ पासून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. अभ्यासातून असे निदर्शनास आले की, तरुणांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात मासिक पाळीविषयीच्या वैज्ञानिक माहितीचा मोठा अभाव आहे. हीच उणीव भरून काढण्यासाठी रत्नागिरीतील दामले प्रशाला, रा. भा. शिर्के प्रशाला आणि जीजीपीएस या तीन प्रमुख शाळांमधून सध्या या दोघींनी ही जनजागृती कार्यशाळा घेतली. हल्ली मुली वयात येण्याचे वय कमी होत चालले आहे. दुसरी-तिसरीतील चिमुकल्या मुलींनाही अनेकदा पाळी येते; मात्र शरीरातील हार्मोन्सचे बदल आणि स्वच्छतेचे नियम समजण्याइतपत त्यांचे वय नसते. अशा वेळी ‘प्ले पिरियड’ हा बोर्ड गेम मदतीला येतो. या खेळातून खालील गोष्टी सोप्या भाषेत शिकवल्या जातात.

मुलींचा याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असे कविता आणि दिव्या यांनी सांगितले. पाळीबद्दल मनात लाज बाळगण्याऐवजी त्याबद्दल सकारात्मक जिज्ञासा निर्माण व्हावी आणि मुलींना आत्मविश्वास मिळावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. व्यवसायाने वास्तुविशारद असलेल्या या दोघींनी केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता समाजासाठी दिलेले हे योगदान कौतुकास्पद ठरत आहे.

..ही माहिती दिली जाते !
* शास्त्रीय ज्ञान: मासिक पाळी म्हणजे काय याची संदर्भासहित माहिती.
* स्वच्छतेचे धडे: पाळीदरम्यान शरीराची काळजी आणि स्वच्छता कशी राखावी.
* गैरसमजांचे निवारण: पाळीशी निगडित सामाजिक प्रथा आणि गैरसमजावर विज्ञानाच्या आधाराने मात.
* पर्यावरणपूरक पर्याय: कापडी पॅड आणि मेन्स्ट्रुअल कप यांसारख्या साधनांची ओळख.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 15-01-2026