Rajapur : साखरीनाटे येथे गोवा राज्यातील ‘हॉली क्रॉस IV’ नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई

राजापूर : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत रत्नागिरी जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाने मोठी कारवाई केली आहे. १३ जानेवारी २०२६ रोजी ड्रोन सर्व्हेलन्स मोहिमेअंतर्गत गोवा राज्यातील ‘हॉली क्रॉस IV’ (नोंदणी क्रमांक IND.GA.01.MM.2640) ही मच्छीमार नौका महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर संशयास्पद रित्या फिरताना आढळली होती. या नौकेवर ड्रोनच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत पाळत ठेवण्यात आली आणि स्थानिक मच्छिमारांकडूनही माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाच्या ‘नवदुर्गा’ या गस्ती नौकेद्वारे साखरीनाटे येथील परवाना अधिकारी पार्थ तावडे आणि रत्नागिरीचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी गस्त घातली असता, रात्री ९.०२ वाजता ही नौका प्रत्यक्ष ‘पर्ससीन’ पद्धतीने बेकायदेशीर मासेमारी करताना रंगेहात पकडण्यात आली.

सध्या ही नौका विभागाच्या ताब्यात असून ती राजापूर तालुक्यातील साखरीनाटे बंदरात जप्त करून ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी नौकेवर प्रतिवेदन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाई सह आयुक्त मत्स्यव्यवसाय (सागरी) महेश देवरे, कोकण विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त नागनाथ भादुले आणि रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक तुषार करंगुटकर, पुरुषोत्तम घावाळी आणि रत्नागिरी सुरक्षा रक्षक पथकाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. परवाना अधिकाऱ्यांमार्फत प्रतिवेदन दाखल झाल्यानंतर, या नौकेबाबतची पुढील सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या न्यायालयात पार पडणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 15/Jan/2026