चिपळूण : दिवाळीमुळे रेल्वे आणि एसटीचे बुकिंग फुल्ल झाले आहे. खासगी बसचालक त्याचा गैरफायदा घेत आहेत. एसटीच्या तिकीट दरापेक्षा दुप्पट, तिप्पट दर आकारले जात आहेत. त्यामुळे दिवाळीला पुण्याहून चिपळूणला येणाऱ्या आणि पुन्हा पुण्यात जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे.
दिवाळीमुळे गावी येण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेल्य असतो. रेल्वेच्या काही नियमित आणि विशेष गाड्या फुल्ल आहेत. मुंबईतून येणाऱ्यांना रेल्वे सोयीची होते. मात्र जागा मिळत नाही. त्यामुळे लोक खासगी बसने प्रवास करतात. पुण्यातून येणाऱ्या लोकांना पनवेलमार्गे चिपळूणला यावे लागते. हा प्रवास लांबचा होतो. त्यामुळे पुण्यातील प्रवासी सातारा, उंब्रज, पाटणमार्गे खाजगी बसमार्गे चिपळूणला येतात. एसटीची कमतरता असल्याने प्रवाशांचा ओढा खासगी वाहनांकडे आहे. याच संधीचा फायदा घेऊन खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांकडून लूट सुरू आहे.
नोकरी व कामानिमित्त पुण्यात वास्तव्य करणाऱ्या चिपळूण, गुहागर व परिसरातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवाळी जसजशी जवळ येत आहे, तसतशी गायी येणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाहत आहे. याच संधीचा फायदा खासगी बसचालक घेत आहेत. २८ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत आहे. या काळात चिपळूण-पुणे मार्गावर धावणाऱ्या खासगी बसेस आधीच बुक झाल्या आहेत. दिवाळीनंतरच्या परतीच्या प्रवासाची परिस्थिती आणखीन वाईट असण्याची शक्यता आहे. जेथे भाडे जवळपास तिप्पट असू शकते. चिपळूण शहरासह उपनगरांत अनेक ठिकाणी खासगी बसचालकांचे थांबे आहेत. तेथे प्रवासी सोडले जातात आणि तेथून घेतले जातात. खाजगी बसमध्ये उपलब्ध जागांची संख्या मर्यादित असल्याने खासगी बसच्या तिकीट दरात विमानाच्या दराएवढी वाढ केली आहे.
चिपळूण-पुणे मार्गावर धावणाऱ्या अनेक खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांचे दर तुलनेत अधिक आहेत. कोकणात येण्यासाठी खासगी गाड्यांचे तिकीट दर दोन ते तीन हजार रुपये आहेत. पुण्यात दहा ते पंधरा हजार रुपयात काम करणारे तरुण सहकुटुंब गावी येणार असतील तर महिन्याचे तिकीट त्यांना कमी पडते. मग महिन्याच्या पगारात दिवाळीची खरेदी काय करायची, कुटुंब कसे चालवायचे आणि प्रवास कसा करायचा, असा प्रश्न पडतो. – आदित्य केळकर, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 28/Oct/2024














