रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे (Zilla Parishad & Panchayat Samiti Election) वारे वाहू लागले असून, शिवसेनेने (Shiv Sena) आज आपल्या उमेदवारीची पहिली घोषणा करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पाली पंचायत समिती गणातून डॉ. पद्मजा संजय कांबळे (Dr. Padmaja Sanjay Kamble) यांची उमेदवारी पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे. शिवसेनेने एका उच्चशिक्षित महिलेला उमेदवारी देऊन आपण नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
पालीतून उच्चशिक्षित चेहरा
पाली पंचायत समितीचा गण हा अनुसूचित जाती (SC) महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या जागेसाठी शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता असतानाच, पालकमंत्री उदय सामंत यांनी डॉ. पद्मजा कांबळे यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेमुळे डॉ. कांबळे या शिवसेनेच्या रत्नागिरीतील पहिल्या अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत.
प्रस्थापितांना धक्का, नवीन चेहऱ्यांना संधी
शिवसेनेने या निवडणुकीत ‘नवीन आणि सुशिक्षित चेहरा’ (New and Educated Faces) हे सूत्र स्वीकारल्याचे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ पंचायत समितीतच नाही, तर जिल्हा परिषदेतही (ZP) तब्बल ५० टक्क्यांपेक्षा जास्त नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. पक्षाच्या या धोरणामुळे वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या आणि उमेदवारीची आस लावून बसलेल्या प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
इच्छुक उमेदवार ‘गॅसवर’
पहिल्याच उमेदवारी घोषणेत शिवसेनेने उच्चशिक्षित उमेदवाराला पसंती दिल्याने पक्षातील इतर इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. तिकीट कापले जाण्याच्या भीतीने अनेकजण आता ‘गॅसवर’ असून, पालकमंत्री उदय सामंत यांच्या या ‘धक्कातंत्रा’चा फटका कोणाकोणाला बसणार? आणि कोणाचे नशीब उघडणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात एकीकडे जुन्या जाणत्यांना बाजूला सारून तरुणांना आणि सुशिक्षित उमेदवारांना बळ देण्याची शिवसेनेची ही खेळी आगामी निवडणुकीत किती फायदेशीर ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.











