Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हवामाना संदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पुढील ४८ तासांत राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून, किमान तापमानात लक्षणीय घट होणार आहे.
उत्तर भारतातील शीतलहरींचा परिणाम राज्यावर दिसून येणार आहे. (Maharashtra Weather Update)
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर भारतात सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडी आणि दाट धुक्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रावरही जाणवणार आहे. (Maharashtra Weather Update)
महाराष्ट्रात तापमानाचा चढ-उतार
गेल्या काही दिवसांपासून राज्यात दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरण होते. मात्र आता हे ढगाळ वातावरण हळूहळू निवळत असून, त्याचा थेट परिणाम तापमानावर दिसून येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट अपेक्षित आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा अधिक जाणवेल. पुढील काही दिवसांनंतर उत्तर महाराष्ट्रात तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गोवा भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. दिवसा सूर्यप्रकाश तीव्र असल्याने उष्णता जाणवेल, मात्र रात्री गारवा कायम राहील.
मुंबईचं हवामान कसं असेल?
मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात आकाश प्रामुख्याने निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.
कमाल तापमान: ३२ ते ३३ अंश सेल्सिअस
किमान तापमान: १७ ते १९ अंश सेल्सिअस
पहाटे आणि रात्री हवेत थंडावा जाणवेल. धुक्याचं प्रमाण फारसं नसेल, मात्र स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दुपारच्या वेळी उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी आणि उष्णता असा दुहेरी अनुभव मुंबईकरांना येऊ शकतो.
उत्तर भारतात थंडीचा कहर; महाराष्ट्रावर अप्रत्यक्ष परिणाम
दिल्ली, नोएडा, चंदीगडसह उत्तर भारतात थंडीने अक्षरशः कहर केला आहे. दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १६ ते २१ जानेवारीदरम्यान उत्तर भारतात शीतलहरी (Cold Wave) सक्रिय राहणार आहेत.
दिल्ली आणि आसपासच्या भागात तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
पहाटेच्या वेळी अतिदाट धुके राहण्याचा इशारा देण्यात आला असून वाहनचालकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
या तीव्र थंडीच्या लाटेचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही जाणवणार असून, विशेषतः रात्री आणि पहाटे गारठा वाढेल.
शीतलहरींचा प्रभाव आणखी वाढणार
पुढील ४८ तास उत्तर भारतात अत्यंत थंड आणि धुक्याचे असतील.
आज (१६ जानेवारी) रोजी हिमालयीन भागात आणखी एक पश्चिमी झंझावात दाखल होणार आहे.
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, शिमला, मसूरी, श्रीनगर परिसरात बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज आहे.
या पश्चिमी झंझावाताचा परिणाम देशातील तापमान पॅटर्नवर होणार असून, महाराष्ट्रातही रात्रीचा गारठा वाढण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
पहाटे आणि रात्री बाहेर पडताना उबदार कपडे वापरणे आवश्यक
ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी
पहाटे वाहन चालवताना धुक्यामुळे दृश्यमानता कमी असू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगावी
मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव वाढत असून, पुढील 38 तास हवामानाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत. दिवसा सूर्यप्रकाशामुळे उष्णता जाणवेल, मात्र रात्री आणि पहाटे गारठा वाढेल.
उत्तर भारतातील तीव्र थंडी आणि शीतलहरींचा परिणाम अजून काही दिवस राज्यावर जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाच्या बदलांकडे लक्ष देत आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
- भाजीपाला, हरभरा, गहू, कांदा, फळबागांमध्ये गारठ्याचा धोका वाढतो. शक्य असल्यास पहाटे हलके पाणी द्यावे, त्यामुळे गारठ्याचा परिणाम कमी होतो.
- डाळिंब, द्राक्ष, केळी, आंबा आदी फळपिकांवर थंडीचा परिणाम होऊ शकतो. सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 16-01-2026














