ZP Election 2026 : आदर्श आचार संहिता कालावधीत रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत फिरत्या वाहनावर ध्वनिक्षेपकास निर्बंध

रत्नागिरी : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी कार्यक्रम १३ रोजी घोषित केला आहे. १३ पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (एन) मधील प्राप्त अधिकारानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपक वापरावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ७ फेब्रुवारी पर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही.

सकाळी ६ पूर्वी आणि रात्री १० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचारासाठी फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी ध्वनिक्षेपकाच्या वापरा संबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळवणे बंधनकारक राहील. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. हे आदेश ध्वनिक्षेपकावर पोलिस विभागाने जाहीर करून प्रसिद्धी करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 16/Jan/2026