Ratnagiri Police : जिल्हा पोलीस दलाचा नाविन्यपूर्ण उपक्रम; ”मिशन प्रगती”तून तक्रारदाराला तपासाची माहिती मिळणार मोबाईलवर

रत्नागिरी : पोलीस ठाण्यात तक्रार अथवा एफआयआर दाखल झाल्यानंतर दिलेल्या तक्रारीचा तपास कशाप्रकारे सुरू आहे किंवा तपास कसा पुढे सरकत आहे, काय कार्यवाही होत आहे किंवा झाली आहे, याची माहिती तक्रारदारास वेळेवर मिळत नाही व त्यासाठी बऱ्याच वेळा तक्रारदाराला, फिर्यादीला संबंधित पोलीस ठाण्यांत वारंवार जावे लागते. त्यामुळे काही प्रमाणात अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास टाळण्यासाठी तसेच आपल्या तक्रारीच्या तपासाची पारदर्शक माहिती वेळेवर मिळावी यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने “मिशन प्रगती” हा उपक्रम सुरू केला आहे.

या मिशन अंतर्गत जिल्ह्यात दाखल झालेल्या सर्व एफआयआर संदर्भात तक्रारदारांना, फिर्यादींना तपासाची सद्यस्थिती व्हाट्सअॅप व एसएमएसच्या माध्यमातून थेट कळविण्यात येते. या “मिशन प्रगती” अंतर्गत आत्तापर्यंत जवळपास १,४५० फिर्यादींना रत्नागिरी पोलीस दलामार्फत ४,५०८ संदेश (मेसेज) व्हाट्सअॅप आणि एसएमएसच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. या मिशनचे कामकाज हे पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत नेमण्यात आलेल्या दोन पोलीस अंमलदारांमार्फत केले जात आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांनुसार, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिक-केंद्रित पोलिसिंग, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उद्देशाने अनेक विशेष मिशन, प्रोजेक्ट व डिजिटल अॅप्लिकेशन्स सुरू केले आहेत. या उपक्रमांमध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे.

याच संकल्पनेतून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने “मिशन प्रगती” हा एक विशेष लोकाभिमुख उपक्रम १० जुलै २०२५ पासून अंमलात आणलेला आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत प्राप्त झालेल्या विविध तक्रारींचे पुढे काय झाले, आपण दिलेल्या तक्रारीचा, फिर्यादीचा पुढे तपास कसा होत आहे, याबाबत तक्रारदाराला, फिर्यादीला माहिती देणे सुलभ करण्याच्या उद्देशाने “मिशन प्रगती” हा विशेष लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे.

पाठवलेल्या मेसेजमध्ये घटना स्थळाचा पंचनामा, आरोपींना अटक केल्याची माहिती, आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ अन्वये दिलेली नोटीस अथवा गुन्ह्याचे दोषारोप-पत्र न्यायालयात पाठविली आहे व तपासातील महत्त्वाच्या टप्प्यांबाबत अद्ययावत माहिती) याबाबत माहिती सर्व फिर्यादी / तक्रारदार यांना दिली जाते. पाठविण्यात येणारे संदेश हे केवळ त्यांच्या दाखल तक्रारीबद्दल, गुन्ह्याच्या तपासाबाबत वेळोवेळी अद्ययावत माहिती देणे आहे, या उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा. जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या तक्रारी प्रभावी, पारदर्शक व वेळेत मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच “मिशन प्रगती” या उपक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण अथवा त्रुटी आढळल्यास नागरिकांनी थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 16/Jan/2026