रत्नागिरी : दरवर्षी १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. यावर्षी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘बोलींचा जागर’ हा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय भाषा संचालनालयामार्फत घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यक्रम गोगटे जोगळेकर या स्वायत्त महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये होणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या बोलींना मंचावर स्थान मिळणार आहे. भंडारी बोली, तिलोरी कुणबी बोली, मुस्लिम कोकणी बोली यांच्या विषयी सखोल मंथन या कार्यक्रमात होणार आहे. सकाळी ९ वाजता शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी आयोजित करण्यात येईल. शोभायात्रा झाल्यानंतर १० वाजता डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये ‘बोलींचा जागर’ कार्यक्रम सुरू होईल.
महाराष्ट्र गीताने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. शासनाची भूमिका भाषा संचालनालयातर्फे कार्यक्रमाच्या समन्वयक श्रीमती आरती वेलिंग प्रस्ताविक करतील. श्रीमती आरती वेलिंग, पर्यवेक्षक श्रीमती मधुरा देसाई, अनुवादक श्रीमती कोमल पवार, वरिष्ठ लिपिक श्रीमती रिया मढये या शासनातर्फे कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. यानंतर तीनही बोलीतील कविता, लोककला, लोकनृत्य असे कलाप्रकार सादर होणार आहेत. त्यानंतर संबंधित बोलींचे तीन अभ्यासक या बोलींचा उगम आणि विकास, तिची स्वरूप वैशिष्ट्ये, मराठी भाषेतील तिचे महत्त्व, तिचा वापर, सद्यस्थिती आणि तिचे जतन संवर्धन करण्याची गरज याविषयी करणाऱ्या उपाययोजना याविषयी मार्गदर्शनपर भाषण करणार आहेत.
भंडारी बोलीसाठी प्रसाद गवाणकर, तिलोरी कुणबीबोली साठी अमोल पालये, तर मुस्लिम कोकणी बोलीसाठी डॉ. निधी पटवर्धन मार्गदर्शन करतील. यानंतर संबंधित बोली बोलणारे पाच प्रातिनिधिक लोक पाच मिनिटांमध्ये आपल्या बोलीविषयी अनुभव आणि अडचणी कथन करतील.
या तीनही बोलींपैकी रत्नागिरी जिल्ह्यातील कोणाला अनुभव कथन करायचे असल्यास गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. निधी पटवर्धन (९४२१४३९६६४) यांच्याशी संदेशाद्वारे संपर्क करावा. कार्यक्रमाची सांगता अध्यक्षीय समारोपाने होणार आहे. या जागर कार्यक्रमास रत्नागिरी जिल्ह्यातील बोली अभ्यासक, भाषाप्रेमी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 16/Jan/2026










