मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो… नाखरेतील शाळेतील विद्यार्थ्यांचा उटण्यांच्या पाकिटावर संदेश

पावस : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्येक व्यक्तीच्या सृजनात्मक क्षमतेच्या विकासावर विशेष भर देते. हे लक्षात घेऊन रत्नागिरी तालुक्यातील नाखरे शाळेत सुगंधी उटणे आणि आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत उटण्याच्या पाकिटांवर आधी जाईन मतदानाला, मगच जाईन कामाला, अशी वेगवेगळी घोषवाक्ये लिहून मतदानाबाबत जागृतीचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे.

कार्यशाळेत तयार केलेल्या उटण्याच्या पाकिटावर आधी जाईन मतदानाला, मगच जाईन कामाला: माझा देश-माझी जबाबदारी, मतदान करूनच जाईन घरी, राष्ट्रीय कर्तव्य आधी बजावू, नंतर अन्य कामे करू: आपले कर्तव्य-आपले मतदान, मतदान आपला हक्क आहे. २० नोव्हेंबर ठरलं आहे: मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, अशी घोषवाक्ये लिहून स्थानिक पातळीवर जनजागृती करण्याचा प्रयत्न नाखरे शाळेतील विद्यार्थ्यांनी केला आहे.

कार्यशाळेत ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे सुमारे दोनशे कंदील, उटण्याची पाकिटे तपार करून विक्री करण्यात आली. शाळेचे पदवीधर शिक्षक सुहास वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शिक्षक राजेंद्र भिंगार्डे, श्रवणी केळकर, अंगणवाडी सेविका मंगला चव्हाण, स्वयंपाकी पूजा धुळप, मनीषा धुळप, मीना राजू मंच यांचे विशेष सहकार्य लाभले.

दिवाळीचे औचित्य साधून नाखरे ग्रामस्थांना अल्प किमतीत शाळेने आकाशकंदील उपलब्ध करून दिले. तसेच उटणे कार्यशाळेतून मतदान जागृतीचा स्तुत्य प्रयत्न केल्याबद्दल सरपंच विजय चव्हाण, केंद्रप्रमुख रिहाना म्हसकर, विस्तार अधिकारी सायली सावंत, गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

स्थानिक गरज ओळखून आयोजित केलेल्या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे, संवाद कौशल्य, खरेदी-विक्री कौशल्य वाढावे, श्रमप्रतिष्ठा, व्यवसायदृष्टी वृद्धिंगत होण्यास चालना मिळत आहे. – शशिकांत घाणेकर, मुख्याध्यापक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 28/Oct/2024