लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मिलिंद उर्फ बाबा लांजेकर यांची बिनविरोध निवड

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवारी अपेक्षितपणे बिनविरोध पार पडली. त्यामध्ये उपनगराध्यक्षपदी अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मिलिंद उर्फ बाबा लांजेकर यांची तर स्वीकृत नगरसेवक पदी माजी नगरसेविका दुर्वा प्रसाद भाईशेट्ये आणि सचिन डोंगरकर यांची निवड करण्यात आली. त्यामुळे दै. प्रहार ने जाहीर केलेले वृत्त तंतोतंत खरं ठरले. लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक आज शुक्रवारी दुपारी बिनविरोध पार पडली. त्यानंतर आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर यांना खुर्चीत विराजमान करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार किरण सामंत यांच्या हस्ते मिलिंद (बाबा) लांजेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालेल्या दुर्वा प्रसाद भाईशेट्ये यांचा नगराध्यक्ष सावली कुरूप यांच्या हस्ते तर सचिन डोंगरकर यांचा जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर आमदार किरण सामंत यांच्यासह नगराध्यक्षा सावली सुनील कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, स्विकृत नगरसेविका दुर्वा भाईशेट्ये, सचिन डोंगरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, लांजा तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई त्याचप्रमाणे लांजा गावचे मानकरी कमलाकर गांधी, विठोबा लांजेकर, लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, उद्योजक विकास शेट्ये, शिवाजी कोत्रे, भाजपा तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, विराज हरमले, जिल्हा बँक संचालक मुन्ना खामकर, नगरसेवक योगेश कावतकर, महंम्मद रखांगी, प्रसन्न शेट्ये आदींसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर म्हणाले की आमदार किरण सामंत यांनी टाकलेला विश्वास आपण नक्कीच सार्थकी लावून लांजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन काम करू असे आश्वासन दिले. यावेळी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, नगरपंचायत निवडणुकीत लांजा वासियांनी जो महायुतीवर आणि आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. विकास कामे करताना कोणताही भेदभाव किंवा दुजाभाऊ केला जाणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊनच कामे केली जातील. आणि लांजा शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल. त्याचप्रमाणे शहर विकास आराखडा राबवताना लोकांच्या सूचना आणि मागणीनुसार आवश्यक ते बदल केले जातील. तर कुवे येथील नागरिकांच्या मागणीनुसार लांजा नगरपंचायतीचे लांजा कुवे नगरपंचायत असे नामकरण केले जाईल असा देखील विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमास लांजा शहरातील नागरिक तसेच विविध संस्था, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी, व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 17/Jan/2026