Sanjay Raut: एकनाथ शिंदे महाराणा प्रतापचा घात करणारा ‘जयचंद’ झाला नसता तर…; निकालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut: एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. ज्यांनी आपल्या मराठी साम्राज्याचा जरीपटका खाली उतरवला आणि त्याच हाताने ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकवला, त्या बाळाजी पंत नातू आणि जयचंद यांच्या अवलादी असल्याचा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष होतं आणि त्या वर्षामध्ये तुम्ही मराठी माणसाशी बेईमानी केली, गद्दारी केल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि महानगरपालिका. यापुढे आता एकनाथ शिंदेंचं रोज अध:पतन आणि घसरण सुरू होईल. सत्ता नसली याचा अर्थ लढाई संपली असं होत नाही. उलट सत्ता नसताना लढाईला रंग जास्त चढतो. आम्ही छातीचा कोट करून मुंबईचं रक्षण करू, असेही राऊत म्हणाले.

भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू

संजय राऊत म्हणाले की, आम्ही दोघांना मिळून म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे यांना मिळून आम्ही 71 जागा जिंकलो. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आमच्या मागे ठामपणे उभा राहिला, त्यामुळे 71 जागा या परिस्थितीत जिंकणं मोठी अचिव्हमेंट आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाकडे तीनच बहुमत आहे. साधारण 110 लोक विरोधामध्ये सभागृहामध्ये आहेत. त्यात शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसचे धरून शंभरावर इतर आहेत. हा 100 च्या वरचा विरोधकांचा आकडा कमी वाटतोय का? असे ते म्हणाले. शिवसेना आणि इतर सगळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू. त्यांना मुंबई अदानीच्या घशात कोणत्याही परिस्थितीत घालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

12 ते 13 जागा या 50 ते 200 मतांच्या फरकानं दुर्देवानं पाडल्या

राऊत यांनी सांगितले की, आमचे 60 नगरसेवक फोडले, त्यातले 90 टक्के पराभूत झाले. बहुतेक सर्व नगरसेवक जे शिंदे गटाकडे गेले ते सर्व पराभूत झाले. ज्यांच्या हातामध्ये सत्ता असते, तेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात जिंकतात हा जवळजवळ सर्वच राज्यातला अनुभव आहे. प्रत्येक वेळेला पैशाचंच राज्य एखाद्या राज्यावर राहत नाही. आमच्या 12 ते 13 जागा या 50 ते 200 मतांच्या फरकानं दुर्देवानं पाडल्या. खूप मोठा संघर्ष आम्हीसत्तेशी, झुंडशाहीशी आणि पैशाच्या ताकतीशी केल्याचे ते म्हणाले. आम्ही सगळ्यांनी, शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जिंकून यावे यासाठी शर्थ केली. त्या त्या ठिकाणी गेलो, बैठका घेतल्या, सर्व प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणाऱ्या मतदारांची दोघांनाही मदत झाली. राज साहेबांच्या पक्षाचे उमेदवार कमी आले, त्याच्यावर आम्ही एकत्र बसून चर्चा करू. ठाकरे बंधू युती ही भविष्यातल्या निवडणुकांसाठी कायम असेल का, ही शंका येण्याचं कारण नाही. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू, असे ते म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 17-01-2026