ZP Election : निवडणुकीसाठी दापोली प्रशासन सज्ज; एक लाख ४० हजार मतदार बजावणार हक्क

दापोली : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकीसाठी दापोली प्रशासन सज्ज असल्याचे प्रांताधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी दापोली तहसीलदार अर्चना बोंबे या देखील उपस्थित होत्या. तालुक्यात ६ जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गण असून २१३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तालुक्यात एकूण ६६ हजार ६६७ पुरुष तर ७३ हजार ८९१ महिला असे एकूण १ लाख ४० हजार ५५८ मतदार आहेत. त्याचबरोबर तालुक्यात जवळपास २ हजार ४०० दुबार मतदार आहेत.

१६ जानेवारी ते २० जानेवारी सकाळी ११ ते दुपारी ३ ६या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी आहे. १८ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही. २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशनाची छाननी व त्यावर निर्णय देणे तसेच याच दिवशी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २३, २४ आणि २७ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. २५ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी मागे घेण्याची नोटीस स्वीकारण्यात येणार नाही.

२७ रोजी दुपारी ३.३० नंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप होणार आहेत. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान तर ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात मतमोजणी कार्यक्रम पार पडणार आहे.

निवडणुकीच्या कामासाठी १ हजार २१७ अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. नामनिर्देशन पत्रे पारंपरिक पद्धतीने जमा केली जाणार आहेत. मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. जालगाव मतदान केंद्रावर सखी मतदान केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. तालुक्यातील ज्येष्ठांपासून युवा वर्गापर्यंत सर्व मतदारांनी आपल्या मतदानाची जबाबदारी बजावावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 17/Jan/2026