देवरुख : पोस्टल सेवा जनसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचाव्यात, तसेच बचत आणि सुरक्षित गुंतवणुकीबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने रत्नागिरी डाक विभागाचे अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोस्ट कार्यालयाच्या वतीने जनजागृती रॅली संगमेश्वर बस स्थानकापासून बाजारपेठ मार्गे पोस्ट कार्यालयापर्यंत काढण्यात आली.
या रॅलीत पोस्टल कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचे मार्गदर्शन पोस्टमास्तर संतोष गवंडी यांनी केले. यावेळी पोस्टल असिस्टंट रवींद्र घडशी उपस्थित होते. ‘ठेव सुरक्षेसाठी व बचतीसाठी’ या घोषवाक्याखाली रत्नागिरी डाक विभागाची विशेष मोहीम यानिमित्ताने जनतेसमोर मांडण्यात आली.
जनतेला बचतीचे विविध लाभमिळावेत या उद्देशाने १९ ते २४ जानेवारी या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान जास्तीत जास्त नवीन खाती उघडण्यावर भर दिला जात आहे. १० वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते, गरजेनुसार विविध मुदतीसाठी टाईम डिपॉझिट, आवर्ती खाते, खाते अशा अनेक आकर्षक आणि लाभदायक योजना डाक खात्यामार्फत उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.
माहे डिसेंबर २०२५ अखेर रत्नागिरी डाक विभागात एकूण १० लाख ९१ हजार २७७ चालू खाती असून, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एप्रिल २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत १ लाख २५ हजार ५२० नवीन पीओएसबी खाती उघडल्याची माहिती देतानाच नागरिकांनी या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी डाक विभागाचे अधीक्षक डी. एस. कुलकर्णी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 17/Jan/2026














