Sangameshwar : बोरसुत येथे जखमी अवस्थेत सापडलेला बिबट्याचा मृत्यू

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बोरसुत परिसरात गुरुवारी जखमी अवस्थेत सापडलेला बिबट्या उपचारासाठी पुण्याकडे नेला जात असताना मृत झाला आहे. सर्पदंशामुळे हा बिबट्या जखमी झाला होता, अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे. जखमी बिबट्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले होते. अधिक उपचारासाठी पुणे येथे नेत असताना वाटेत आंबा घाटातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाने दिली.

बिबट्या जखमी असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्याच्या हालचाली मर्यादित होत्या. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वीच ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेत बिबट्याला गुरुवारी सायंकाळी उशिरा ताब्यात घेतले. पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथे नेत होते.

बिबट्याच्या जखमेचे कारण स्पष्ट झाले नव्हते. वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला सर्पदंश झाल्याचे पुढे आले. उपचार करून बिबट्याला पुणे येथे अधिक उपचारासाठी नेत असताना आंबा येथे बिबट्या मृत झाल्याची माहिती वनविभागाकडून प्राप्त झाली आहे. हा बिबट्या नर जातीचा असून तो पाच वर्षांचा होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 17/Jan/2026