Ratnagiri Police : रत्नागिरी पोलीस दलाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित ‘RAIDS’ अॅप लाँच

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि तपासात गती आणण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित “RAIDS” (Ratnagiri Advanced Integrated Data System) हे नाविन्यपूर्ण अॅप विकसित केले आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे तंत्रज्ञान नागरिक केंद्रित पोलीसिंग आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारे AI चा वापर करणारा हा भारतातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अॅपची तीन प्रमुख वैशिष्ट्येः
देव दृष्टीः या फिचरच्या माध्यमातून बेपत्ता व्यक्ती आणि सराईत गुन्हेगारांचा शोध घेतला जाणार आहे. यामध्ये गुन्हेगारांच्या फोटोंचा मोठा डेटाबेस असून, AI च्या मदतीने एका व्यक्तीच्या १०८ वेगवेगळ्या स्वरूपातील प्रतिमा (उदा. दाढी वाढवलेली, टक्कल असलेले किंवा वेशभूषा बदललेली) तयार केल्या जाऊ शकतात. यामुळे गुन्हेगाराने ओळख लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला पकडणे सुलभ होणार आहे.

देव रूपरेखाः अनेकदा तपासादरम्यान केवळ सांगाडा, सडलेला मृतदेह किंवा साक्षीदाराने सांगितलेले वर्णन उपलब्ध असते. अशा वेळी हे अॅप स्केच आर्टिस्टच्या मदतीने किंवा उपलब्ध अवशेषांवरून त्या व्यक्तीची नवीन प्रतिमा (Image) तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे मृताची किंवा आरोपीची ओळख पटवणे सोपे होते.

बी.एन.एस अॅनालिसिसः नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलमे शोधणे आता सोपे झाले आहे. जर एखाद्या पोलिसाला विशिष्ट गुन्ह्याचे कलम माहित नसेल, तर केवळ गुन्ह्याचे वर्णन सर्च बारमध्ये लिहिल्यास हे अॅप संबंधित कलम (उदा. मर्डर सर्च केल्यास कलम १०३) त्वरित शोधून देते. या आधुनिक प्रणालीमुळे रत्नागिरी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होणार असून, तपासाच्या कामात हे अॅप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तंत्रज्ञानाचा हा प्रभावी वापर पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यास आणि गुन्हेगारांना जेरबंद करण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:57 PM 17/Jan/2026