Chiplun : वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ऋता मुल्हेरकर यांना दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी निमंत्रण

चिपळूण : डेरवण येथील वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ऋता मुल्हेरकर यांना दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी विशेष पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ऋता मुल्हेरकर यांना जैवतंत्रज्ञान विभाग (DBT), भारत सरकार आणि बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (BIRAC) यांच्या BioE3 (Biotechnology for Economy, Environment and Employment) उपक्रमांतर्गत दिल्ली येथे २६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी विशेष पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे हे आमंत्रण डॉ. मुल्हेरकर यांच्या जैवतंत्रज्ञान व जैववैद्यकीय संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेणारे आहे. BioE3 उपक्रमाचा उद्देश नवोन्मेष, पर्यावरणपूरक विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना देत देशातील जैवतंत्रज्ञान क्षेत्र अधिक सक्षम करणे हा आहे.

या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात देशभरातील नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक, नवोन्मेषक आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहेत. डॉ. ऋता मुल्हेरकर यांची उपस्थिती ही त्यांच्या संशोधन कार्याची तसेच राष्ट्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची पोचपावती आहे.

डॉ. ऋता मुल्हेरकर या भारतातील ज्येष्ठ व नामवंत जैववैद्यकीय शास्त्रज्ञ आहेत. त्याचे मुखाचा आणि सर्जीकल कॅन्सर वरील जिन थिरपी संशोधनात अमूल्य योगदान आहे. त्यांनी Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer (ACTREC), टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे दीर्घकाळ सेवा बजावली आहे. देश-विदेशातील अनेक शास्त्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. तब्बल ३० वर्षे टाटा मेमोरियल सेंटर मध्ये संशोधन केल्यानंतर त्या गेली दहा वर्षे येथील वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयात स्टेम सेल वर संशोधन करीत आहेत. कंबर दुखी असणाऱ्या रुग्णाच्या मणक्यातील वेदना निर्माण करणारी घसरलेली चकती प्रयोगशाळेत पुन्हा निर्माण करून कंबर दुखीवर स्टेम सेल द्वारे नवीन चकती निर्माण करण्यात त्यांनी यश संपादन केले आहे. त्यामुळे पेशींची शेती संशोधनाला भारतात नवी दिशा दाखवली आहे.

याशिवाय कर्करोगावर जीवशास्त्र, आण्विक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांतील त्यांचे संशोधन विशेष उल्लेखनीय आहे. कर्करोगाच्या कारणमीमांसा, प्रतिबंध आणि उपचारांमध्ये उपयुक्त ठरणारे अनेक संशोधन प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे राबवले आहेत. डॉ. मुल्हेरकर यांनी कोकणातील अनेक तरुण होतकरू जीवशास्त्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन सक्षम केले आहे. त्यांना मिळालेले आमंत्रण स्वागतार्ह आहे आणि कोकण भूमीचा अभिमान वृद्धिंगत करणारे आहे. असे वालावलकर महाविद्यालय प्रशासनाने म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:46 PM 17/Jan/2026