रत्नागिरीत ‘भक्ती उत्सवा’च्या तयारीचा श्रीगणेशा! गोगटे कॉलेज मैदानावर विधीवत ‘गुरूपूजा’ संपन्न; २२ जानेवारीला गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

रत्नागिरी : विश्वशांतीचे अग्रदूत आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे (Art of Living) प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकरजी (Gurudev Sri Sri Ravi Shankar) यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत होणाऱ्या ऐतिहासिक ‘भक्ती उत्सवा’च्या (Bhakti Utsav) तयारीला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या भव्य सोहळ्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या गोगटे जोगळेकर कॉलेजच्या मैदानावर आज विधीवत ‘गुरूपूजा’ (Guru Puja) करून तेथील कामाचा शुभारंभ करण्यात आला.

२२ जानेवारीला रंगणार सोहळा

येत्या गुरुवारी, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता हा भव्य ‘भक्ती उत्सव’ संपन्न होणार आहे. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीचे महत्त्व वाढवणाऱ्या या कार्यक्रमासाठी हजारो रत्नागिरीकर उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने मैदानावर जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. कोणतीही बाधा येऊ नये आणि कार्य सिद्धीस जावे, यासाठी ही गुरूपूजा करण्यात आली.

आर्ट ऑफ लिव्हिंगची टीम सज्ज

या मंगलप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंग रत्नागिरी टीमच्या वतीने कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका आणि आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर ॲड. जया सामंत (Adv. Jaya Samant) यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षिका सौ. सोनिया, विनिता गोखले, भुवना महागावकर, नितीशा मोरे, अनघा देशपांडे आणि निलेश मिरजकर आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण वातावरण गुरुनामाच्या जयघोषाने आणि सकारात्मक ऊर्जेने भारले गेले होते.