रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी जिल्ह्यात विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
गुहागर तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गटातील पडवे पंचायत समिती गणामधून आनंद भोजने यांनी पंचायत समितीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी परिक्षित पाटील यांच्याकडे दाखल केला. हा या गणातील पहिला उमेदवारी अर्ज असल्याची माहिती आहे.
दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेतर्फे पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला. रत्नागिरी तालुक्यातील पावस जिल्हा परिषद गटातून अॅड. महेंद्र मांडवकर यांनी पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज सादर केला. शिवसेनेतर्फे दाखल झालेला हा पहिलाच उमेदवारी अर्ज ठरला आहे.
या वेळी शिवसेना उपनेते निलेश सांबरे, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक अधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक अधिकारी कार्यालयातून दुसऱ्या दिवशी २५ व्यक्तींनी एकूण ५२ उमेदवारी अर्ज स्वीकारले. तर दोन दिवसांत रत्नागिरी तालुक्यात ३९ व्यक्तींनी ८२ उमेदवारी अर्ज स्वीकारले आहेत. यामध्ये शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), भाजप तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 19-01-2026














