चिपळूण शहरातील बडदेवाडी दरडप्रवण भागांची केंद्रीय पथकाकडून पाहणी

चिपळूण : शहरातील बडदेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी घराच्या छपरावर दरड कोसळण्याची घटना घडली होती. तसेच कांगणेवाडी परिसरातही पावसाळ्यात तीनवेळा दरड कोसळण्याचे प्रकार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दरडप्रवण भागांचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने या भागाची पाहणी केली. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी या दोन्ही ठिकाणी भेट देत पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी नगराध्यक्षांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. या भागांमध्ये वारंवार दरडी कोसळत असल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या ठिकाणी तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असून, त्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

केंद्रीय पथकाने या दरडप्रवण भागांचा अभ्यास करून आपला अहवाल शासनाकडे सादर केला जाईल. त्या अहवालाच्या आधारे आवश्यक निधी मंजूर करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या पाहणी दौऱ्यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले, बांधकाम विभागाचे अधिकारी सुरज चिपळूणकर, श्री. निंबाळकर, रविकांत सातपुते, नगरसेवक उदय जुवळे, सुयोग चव्हाण, निशांत जंगम आदी उपस्थित होते. नगराध्यक्षांच्या पुढाकारामुळे दरडप्रवण भागांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 19/Jan/2026