चिपळुणातील बसस्थानकांसाठी ७ कोटी निधी मंजूर; आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

चिपळूण : चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बाधणीचे काम गेली पाच वर्षे रखडले आहे. मात्र, आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. राज्य परिवहन रत्नागिरी विभागातील चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक पुनर्बाधणीसाठी अतिरिक्त निधी मंजूर करणे तसेच चिपळूण शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बाधणी व चालक-वाहक विश्रांतीगृहाच्या नूतनीकरणासाठी तब्बल ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या कामांच्या निविदा प्रक्रियेला तत्काळ सुरुवात होणार आहे.

ही दोन्ही कामे गेली अनेक वर्षे केवळ कागदावरच अडकून पडली होती. अपुऱ्या सुविधा, मोडकळीस आलेली बांधकामे आणि अस्वच्छतेमुळे दररोज हजारो प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. चालक व वाहकांसाठीही विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा नसल्याने नाराजी होती. या विषयात आ. शेखर निकम यांनी लक्ष घालून पाठपुरावा केला.

प्रवाशांची गैरसोय, चिपळूण शहराची वाढती गरज आणि भविष्यातील दळणवळणाची आवश्यकता शासनाच्या निदर्शनास आणून देत त्यांनी हा प्रश्न प्राधान्याने मांडला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत, या दोन्ही महत्त्वाच्या कामांसाठी ७कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. हा निधी मंजूर झाल्याबद्दल आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष आभार मानले आहेत. चिपळूण शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बाधणी व चालक-वाहक विश्रांतीगृहाच्या नूतनीकरण करणे या कामासाठी सूरज शिंदे (शिरगांव) यांचेही सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 19/Jan/2026