चिपळूण : तालुक्यात पंचायत समितीच्या १८ व जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होत आहे. तालुक्यातील २४५ मतदान केंद्रावर मतदान होणार असून ९० हजार ९३५ पुरूष मतदार, तर ९२ हजार ७३८ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुक्यात ४०४६ दुबार मतदार असल्याचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी सांगितले.
या निवडणुकीसाठी २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. रविवारी सुट्टी असल्याने उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाही. २७रोजी दुपारी ३ पर्यंत संबंधित उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे, तर ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान होणार असून ७ फेब्रुवारीस मतमोजणी केली जाणार आहे.
तालुक्यात कळवंडे, पेढे, खेर्डी, अलोरे, शिरगाव, सावर्डे, उमरोली, वहाळ, कोकरे या ९ जिल्हा परिषद गटात, तर पंचायत समितीसाठी भोम, कळवंडे, खेर्डी, कापसाळ, अलोरे, पिंपळी खुर्द, वेहेळे, शिरगाव, सावर्डे, मांडकी, उमरोली, गुढे, निवळी, वहाळ, कोकरे आणि कुटरे या १८ गणात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत २४५ केंद्रावर मतदान होणार आहे. यातील ३१ मतदान केंद्रात १ हजारहून जास्त मतदारांची संख्या आहे. पेढे येथे ११४९ मतदारांचे सर्वात मोठे केंद्र असून गुढे येथे सर्वाधिक कमी १९२ मतदार संख्येचे केंद्र आहे. या निवडणुकीत ४०४६ मतदार दुबार मतदार आहेत. त्यांना कोणत्याही एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे. या दुबार मतदारांचे प्रशासनाकडून लेखी पत्र घेतले जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 19/Jan/2026














